मोठी बातमी: नांदेड गोळीबारातील शूटरला पंजाबच्या स्पेशल सेलने पकडले

By शिवराज बिचेवार | Updated: February 24, 2025 20:41 IST2025-02-24T20:39:08+5:302025-02-24T20:41:23+5:30

पंजाबच्या स्पेशल सेलने शूटरसह अन्य एकाला पकडले आहे. या शूटरला लवकरच नांदेडात आणण्यात येणार आहे

Big news: Shooter in Nanded shooting arrested by Punjab Special Cell | मोठी बातमी: नांदेड गोळीबारातील शूटरला पंजाबच्या स्पेशल सेलने पकडले

मोठी बातमी: नांदेड गोळीबारातील शूटरला पंजाबच्या स्पेशल सेलने पकडले

नांदेड : शहरातील गुरुद्वारा परिसरात गोळीबाराची घटना घडली होती. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. तर अन्य एक जण जखमी झाला होता. या प्रकरणात दहशतवादी हरविंदर सिंघ रिंदा याचा संबंध असल्याचे पुढे आले होते. त्यानंतर एटीएसने पाच जणांना अटक केली होती. परंतू शूटर मात्र फरार होता. त्यात पंजाबच्या स्पेशल सेलने शूटरसह अन्य एकाला पकडले आहे. या शूटरला लवकरच नांदेडात आणण्यात येणार आहे.

१० फेब्रुवारी रोजी गुरुद्वारा गेट क्रं. ६ च्या पार्कींगमध्ये गुरमितसिंघ राजासिंघ सेवादार आणि रविंद्रसिंघ दयालसिंघ राठाेड या दोघांवर एकाने गोळीबार केला होता. त्यानंतर दुचाकीवरुन हा शूटर पसार झाला होता. गोळीबाराच्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी मिळविले होते. त्यावरुन शूटरची आणि त्याला मदत करणाऱ्या काही जणांची ओळख पटविण्यात आली. या प्रकरणातील शूटर हा बाहेर राज्यातील असल्यामुळे या प्रकरणाचा तपास छत्रपती संभाजीनगरच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे देण्यात आला होता. त्यानंतर मनप्रितसिंघ उर्फ मन्नू गुरबक्षसिंघ ढिल्लो आणि हरप्रितसिंघ उर्फ हॅप्पी बाबुसिंघ कारपेंटर या दोघांना अटक केली होती. या दोघांनी शूटरला मदत केल्याचे पुढे आले होते. त्यांच्या चाैकशीतून दलजीतसिंघ उर्फ जित्ता करमसिंघ संधू आणि हरजितसिंघ उर्फ राजू अमरजितसिंघ गिल या दोघांनाही बेड्या ठोकल्या होत्या. त्यांना २४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सूनावण्यात आली होती. तर अर्शदीपसिंघ भजनसिंघ गिल हा पाचवा आरोपीही अटक करण्यात आला होता. १ मार्चपर्यंत तो कोठडीत राहणार आहे. या प्रकरणात छत्रपती संभाजीनगर एटीएस आणि पंजाबचा स्पेशल सेल तपास करीत होता. 

टार्गेट किलींगसाठी आले अन् सापडले
पंजाबमध्ये टार्गेट किलींगसाठी आलेल्या जगदिशसिंघ उर्फ जग्गा रा. हरिकेपंतग आणि शुभदीपसिंघ उर्फ शुभ औलख रा. तरणतारण हे दोघे टार्गेट किलींगसाठी आले होते. त्यांना पंजाबच्या स्पेशल सेलने पकडले आहे. त्यातील जगदिशसिंघ याने नांदेडात गुरुद्वारा परिसरात गोळीबार केला होता. त्याचे मुख्य टार्गेट हे गुरमितसिंघ सेवादार हे होते. दहशतवादी हरविंदरसिंघ रिंदा याचा भाऊ सत्या याच्या खूनात गुरमितसिंघ हा तुरुंगात शिक्षा भोगत होता. परंतू तो पॅरोलवर बाहेर आला होता.

Web Title: Big news: Shooter in Nanded shooting arrested by Punjab Special Cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.