खबरदार! रस्त्यावर साध्या वेषात पोलीस; झोकांड्या खाऊस्तर पिऊ नका, अन्यथा नवे वर्ष ठाण्यात

By शिवराज बिचेवार | Published: December 29, 2023 05:04 PM2023-12-29T17:04:13+5:302023-12-29T17:04:42+5:30

थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर हुल्लडबाजांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी नियोजन केले आहे. 

Beware! civil dress police on the streets; Don't drink heavy alcohol, otherwise New Year celebrate in Jail | खबरदार! रस्त्यावर साध्या वेषात पोलीस; झोकांड्या खाऊस्तर पिऊ नका, अन्यथा नवे वर्ष ठाण्यात

खबरदार! रस्त्यावर साध्या वेषात पोलीस; झोकांड्या खाऊस्तर पिऊ नका, अन्यथा नवे वर्ष ठाण्यात

नांदेड- येत्या ३१ डिसेंबर राेजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत बार ॲन्ड रेस्टॉरंट उघडे राहणार आहेत. परंतु, नव्या वर्षाचे स्वागत करताना हुल्लडबाजी केल्यास त्यांना कोठडीची हवा खावी लागणार आहे, असा इशारा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिला आहे. रविवारी थर्टी फर्स्टनिमित्त अनेक हॉटेल चालकांनी पार्ट्यांचे आयोजन केले आहे. वेगवेगळ्या ड्रिंक्स आणि जेवणावर विशेष ऑफरही ठेवण्यात आल्या आहेत. हॉटेल उघडे ठेवण्याच्या वेळामध्येही वाढ करण्यात आली आहे. या दिवशी रात्री उशिरापर्यंत मद्य प्राशन करून कर्णकर्कश हॉर्न वाजवित काही जण हुल्लडबाजी करतात. अशा हुल्लडबाजांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी नियोजन केले आहे. 

शहरातील प्रत्येक रस्त्यावर बॅरिकेड लावून ब्रेथ अनालायझरद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यांना दोन ब्रेथ अनालायझर देण्यात आले आहेत. अचानकपणे अंतर्गत रस्त्यावर नाकाबंदी करून तपासणी केली जाणार आहे. त्याची गेल्या तीन दिवसांपासून अंमलबजावणी सुरू आहे. स्वत: पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, उपाधीक्षक कीरीतीका सी.एम. या रात्री उशिरापर्यंत शहरात गस्तीवर आहेत. त्यामुळे नवीन वर्षाचे स्वागत करताना हुल्लडबाजी केल्यास ठाण्यात रवानगी केली जाणार आहे.

साध्या वेषात कर्मचारी तैनात
शहर व जिल्ह्यातील वाइन शॉपच्या बाहेर साध्या वेषात पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. मोठ्या प्रमाणात कोणी दारू घेऊन जात असल्याचे निदर्शनास आल्यास त्याच्यावर वॉच ठेवण्यात येणार आहे. तसेच, हुक्का पार्टी आणि गांजा, अफू यासाह इतर ड्रग्जची नशा करणाऱ्यांवर लक्ष राहणार असून शस्त्रे बाळगणाऱ्यांचीही झाडाझडती घेण्यात येत आहे.

Web Title: Beware! civil dress police on the streets; Don't drink heavy alcohol, otherwise New Year celebrate in Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.