सावधान ! येत्या 48 तासात विदर्भ, मराठवाड्यात गारपीटीचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 19:41 IST2018-02-12T19:39:53+5:302018-02-12T19:41:29+5:30
भारतीय हवामान खात्याच्या नागपूर व मुंबई केंद्राकडून मिळालेल्या सूचनेनुसार, येत्या 48 तासांमध्ये विदर्भामध्ये (विशेषत: अमरावती आणि नागपूर विभाग) व मराठवाड्याच्या बहुतांश भागात वादळीवा-यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.

सावधान ! येत्या 48 तासात विदर्भ, मराठवाड्यात गारपीटीचा अंदाज
नांदेड, दि. 12 : भारतीय हवामान खात्याच्या नागपूर व मुंबई केंद्राकडून मिळालेल्या सूचनेनुसार, येत्या 48 तासांमध्ये विदर्भामध्ये (विशेषत: अमरावती आणि नागपूर विभाग) व मराठवाड्याच्या बहुतांश भागात वादळीवा-यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या भागातील शेतकऱ्यांनी दक्षता घेण्याचे आवाहन मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षाने केले आहे.
वादळी वारा व गारपीटीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती निवारण कक्षाने मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान टाळण्यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावे, बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी, वीजेपासून व गारांपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, मोकळे मैदान, झाडाखाली, वीजवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये, अतिवृष्टीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे, आदी उपाय योजण्यात यावेत. नागरिकांनी वादळी वारे, वीज आणि गारपीटीपासून स्वत:सह गुरा-ढोरांचे संरक्षण होईल याची दक्षता घ्यावी. असे आवाहन राज्य शासनामार्फत करण्यात आले आहे.
यापूर्वी भारतीय हवामान खात्याकडून बुधवार दि. 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.41 वाजता, दि. 11 फेब्रुवारी पासून पुढील 24 तासात विदर्भ क्षेत्रात वादळीवाऱ्यासह गारपीट होण्याचा इशारा मिळाला होता. हा इशारा विचारात घेऊन मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून ही माहिती सर्व संबंधित जिल्हाधिकारी, निवासी उप जिल्हाधिकारी तसेच सर्व संबंधित जिल्ह्यांचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांना दूरध्वनी,व्हॉटसअप, एसएमएस व इमेलद्वारे तातडीने कळविण्यात आली आहे. तसेच भारतीय हवामान खात्याकडून त्यानंतर प्राप्त झालेले सर्व इशारे वेळोवेळी सर्व संबंधितांना तातडीने कळविण्यात आले आहेत.