मुखेड मतदारसंघात अनेकांचे गुडघ्याला बाशिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:33 AM2019-07-09T00:33:12+5:302019-07-09T00:34:47+5:30

मुखेड - कंधार विधानसभा मतदारसंघ २००९ पूर्वी अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ २००९ च्या निवडणुकीपासून खुल्या प्रवार्गासाठी राखीव झाला़ येत्या २०१९ च्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे़

Bashing of many knee in Mukhed constituency | मुखेड मतदारसंघात अनेकांचे गुडघ्याला बाशिंग

मुखेड मतदारसंघात अनेकांचे गुडघ्याला बाशिंग

Next
ठळक मुद्देउमेदवारीसाठी होणार रस्सीखेच वंचित फॅक्टरही ठरणार निर्णायक यापूर्वी काँग्रेसचेच होते वर्चस्व

दत्तात्रय कांबळे।
मुखेड : मुखेड - कंधार विधानसभा मतदारसंघ २००९ पूर्वी अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ २००९ च्या निवडणुकीपासून खुल्या प्रवार्गासाठी राखीव झाला़ येत्या २०१९ च्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे़ त्यामुळे उमेदवारी मिळविण्यासाठी बरीच रस्सीखेच होण्याची शक्यता आहे़
२०१४ च्या निवडणुकीत प्रामुख्याने भाजपाचे डॉ. तुषार राठोड व कॉंग्रेसचे हणमंत पाटील बेटमोगरेकर यांच्यात लढत झाली. या निवडणुकीत डॉ.तुषार राठोड हे विजयी झाले. परंतु आगामी विधानसभेसाठी मुखेड - कंधार मतदारसंघातून भाजपाकडून आ. डॉ. तुषार राठोड यांच्यासह गणाचार्य मठसंस्थानचे मठाधिपती डॉ. वीरुपाक्ष शिवाचार्य महाराज, धर्मभूषण मुख्याधिकारी रामदास पाटील, उद्योजक बालाजी पाटील कार्लेकर हे इच्छुक असून मागील महिन्यात त्यांनी दिल्ली गाठल्याची चर्चा आहे़ माधवअण्णा साठे व व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनीसुद्धा पक्षातील बड्या नेत्यांच्या गाठीभेठी घेतल्या आहेत़
या मतदारसंघात लिंगायत समाजाचे प्राबल्य असून रामदास पाटील हे त्यांनी पक्षातील दिग्गजांच्या भेटी घेतल्या आहेत़ तेही प्रमुख दावेदार आहेत. सर्वच पक्षातील नेत्यांसोबत त्यांची ऊठबस आहे़ त्यामुळे राठोड यांच्या चिंतेत भर पडली आहे़ कॉग्रेसकडून माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर व शेषेराव चव्हाण यांची नावे पुढे आहेत.
तर वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. रामराव श्रीरामे, डॉ. व्यंकटराव सुभेदार किंवा ऐनवेळी दुसरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहण्याची शक्यता आहे़ तालुक्यात हटकर - धनगर व मागासवर्गीय एस.सी. समाजाची मतदानाची टक्केवारी पाहता वंचित आघाडी ही लोकसभेसारखीच विधानसभेमध्ये सुध्दा भाजपा-काँग्रेसची डोकेदुखी ठरणार हे मात्र निश्चित आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत कॉग्रेसचे विजयी उमेदवार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर हे थोड्या फरकाने विजयी झाले तर अपक्ष उमेदवार मा.आ.कै.गोविंदराव मक्काजी राठोड हे पराभूत झाले होते.
२०१४ च्या पोटनिवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेवर डॉ़ तुषार राठोड हे विजयी झाले होते़ त्यामुळे गेल्या पाच वर्षांत सहानुभूतीची लाट किती आहे़ यावरही राठोड यांचे भवितव्य अवलंबून आहे़
असे जरी चित्र असले तरी सध्या मुखेड - कंधार मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या ९ गटांपैकी कॉग्रेसचे ४ , भाजपाचे ३, सेना १ व अपक्ष १ असे आहेत. तर मुखेड तालुक्यात भाजपा ३ व कॉग्रेस ३ व सेना १ असे ७ सदस्य असून भाजप कॉग्रेस ३-३ ने बरोबरीत आहेत. मुखेड तालुक्यातील पंचायत समितीमध्ये भाजपाचे ८ , कॉग्रेसचे ४ व सेनेचे २ आहेत. तर कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण १८ जागांपैकी १४ भाजपा व कॉग्रेस सेना युतीला ४ जागा आहेत. तर नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष कॉग्रेसचे बाबूराव देबडवार असून नगरसेवक मात्र भाजपा-सेनेचे १२, काँग्रेस २, रासपा २, अपक्ष- १ भाजपाचे २ स्वीकृत सदस्य आहेत. यातही १९ पैकी १४ सदस्य हे भाजपाचे असल्यामुळे पक्षीय बलाबलमध्ये भाजपा पुढे आहे. तर पंचायत समिती व कृउबा समिती नगरपरिषदेत बहुमत व तालुक्यातील १२८ ग्रामपंचायतींपैकी जास्त ग्रामपंचायती
भाजपाच्या ताब्यात आहेत़ शिवसेनेचे आ़ सुभाष साबणे व हम पांचमधील माजी आ़ अविनाश घाटे, बळवंत पाटील बेटमोगरेकर, बालाजी पाटील अंबुलगेकर, खुशाल पाटील उमरदरीकर हे विधानसभेला कोणाच्या मागे राहतील, यावरही विजयाचे गणित अवलंबून आहे़ सध्यातरी मतदारसंघात अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याचे चित्र दिसून येत आहे.

Web Title: Bashing of many knee in Mukhed constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.