उन्हामुळे केळीच्या बागा करपल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:22 IST2019-06-02T00:20:23+5:302019-06-02T00:22:24+5:30
अर्धापूर तालुक्यात सध्या उन्हाचा पारा चढला असून त्याचा परिणाम केळीच्या बागावर दिसून येत आहे़ वाढत्या तापमानामुळे केळीचे झाडे करपण्यास सुरुवात झाली़ तसेच उन्हाच्या तीव्रतेमुळे केळीची झाडे अर्ध्यातून मोडून बागांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत़

उन्हामुळे केळीच्या बागा करपल्या
पार्डी : अर्धापूर तालुक्यात सध्या उन्हाचा पारा चढला असून त्याचा परिणाम केळीच्या बागावर दिसून येत आहे़ वाढत्या तापमानामुळे केळीचे झाडे करपण्यास सुरुवात झाली़ तसेच उन्हाच्या तीव्रतेमुळे केळीची झाडे अर्ध्यातून मोडून बागांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत़
मागील चार दिवसांपासून तापमान ४४ ते ४५ अंशापर्यंत गेल्याने केळीच्या बागांना तापमानाचा फटका बसला आहे़ त्याचबरोबर वीजपुरवठा खंडित असल्याने आणि वीजपुरवठा कमी दाबाने होत असल्याने विहीर व बोअरवरील वीजपंप चालत नाहीत. त्याचाही परिणाम केळीच्या बागावर होत असल्याचे सांगण्यात येत आहे़ केळी पिकाला पाणी मिळत नसल्याने झाडे अर्ध्यातून मोडून पडत आहेत़ योग्य काढणीच्या वेळी तापमानात वाढ झाल्याने केळीच्या झाडाचे वजन कमी भरत असल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे़ सध्या तापमानाचा पारा ४५ अंशांपर्यंत पोहोचला आहे. मोठ्या मेहनतीने जोपासलेली केळी काढणीच्या वेळी तापमानात वाढ झाल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. गतवर्षी केळीचे मोठे नुकसान झाले होते. अनेक संकटांतून सावरलेल्या केळीच्या बागा मात्र उन्हाच्या तीव्रतेमुळे पुन्हा एकदा संकटात सापडलेल्या असल्याचे दिसून येत आहे़
रमजान महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केळीला १२०० रुपये प्रतिक्विंटल भाव आहे़ परंतु तापमानामुळे केळीच्या बागाचे नुकसान होत असल्याने ऐनवेळी शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास तापमानामुळे हिरावून घेतला आहे - राजकुमार मदने, शेतकरी
पाण्याची कमतरता व तापमानात वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी केळीच्या बागेस रात्रीच्या वेळी जमेल तेवढे पाणी द्यावे, जेणेकरून जमिनीचा ओलावा राहील आणि केळीला संतावा बसणार नाही. रात्रीच्या वेळी दिलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होणार नाही, याची शेतक-यांनी काळजी घ्यावी - बी. बी.गाजेवाड, कृषी सहायक अधिकारी, अर्धापूर