बाळासाहेबांची शिवसेना उरली नाही - सूर्यकांता पाटील
By Admin | Updated: February 14, 2017 18:27 IST2017-02-14T18:27:16+5:302017-02-14T18:27:16+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आता उरली नाही़ हा पक्ष आत्मघातकी ठरला आहे़, अशी टीका भाजपा नेत्या, माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील

बाळासाहेबांची शिवसेना उरली नाही - सूर्यकांता पाटील
ऑनलाइन लोकमत
तामसा (जि़ नांदेड) , दि. 14 - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आता उरली नाही़ हा पक्ष आत्मघातकी ठरला आहे़, अशी टीका भाजपा नेत्या, माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी तामसा (ता. हदगाव) येथे प्रचारसभेत केली़
शिवसेनेवर टीका करीत माजी केंद्रीय राज्यमंत्री पाटील म्हणाल्या, शिवसेना व त्यांचे नेते विकासावर एक शब्द बोलायला तयार नाहीत़ केवळ चेष्टा आणि टवाळी करणारी मंडळी उरली आहे़ हदगावमध्येही इतरांनी केलेल्या कामाचे श्रेय स्वत:च्या नावावर लिहिण्याची धडपड सुरू आहे़ आपण ग्रामविकास राज्यमंत्री असताना पैनगंगा नदीवर कोल्हापुरी बंधाऱ्याचे नियोजन केले़ मोठ्या मेहनतीने साखर कारखाना उभा केला, परंतु तो पुढे अवसायानात निघाला़ कर्ज झाल्याने आर्थिक डबघाईला सामोरे जावे लागले़
आम्ही लहानपणी रेल्वेचा धूर पाहण्यासाठी कांडलपर्यंत जात होतो़ आता हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनाही आपला शेतीमाल भविष्यात रेल्वेने पाठविता येईल़ नांदेड-यवतमाळ रेल्वे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी नांदेडची रेल्वे संघर्ष समिती तसेच तत्कालीन खा़ विजय दर्डा यांचा पाठपुरावा महत्त्वाचा ठरला़ आता भूमी अधिग्रणास सुरुवात झाली आहे़ काहीजण जमीन अधिग्रहणाला विरोध करीत आहेत, परंतु विकासकामासाठी मदत केली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या़ (वार्ताहर)