उमरी (जि.नांदेड) : उमरीहून प्रवासी घेऊन निमटेक येथे जाणाऱ्या ऑटोसमोर अचानक वानर आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात ऑटो उलटला. या अपघातात वानराचा जागीच मृत्यू झाला आहे. उपचारादरम्यान सोमवारी रात्री जक्कोजी गंगाराम पोवाडे या वृद्धाचा मृत्यू झाला, तर सहाजण जखमी झाले आहेत.
सोमवार रोजी दुपारी चिंचाळा पाटीसमोर हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच उमरी तालुक्यातील निमटेक येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. यातील गंभीर जखमी झालेल्या जक्कोजी गंगाराम पोवाडे, वल्लीसाब मजितसाब शेख (रा. निमटेक) यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तर संभाजी विठ्ठल चंदापुरे, वंदना साहेबराव वाघमारे, पार्वतीबाई विठ्ठल सुकरू, इंदरबाई माणिक मॅकले, साईबिनबाई साहेबराव सरोदे, चक्रवत्ती सटवा सरोदे हे किरकोळ जखमी झाले. गंभीर जखमी झालेले जक्कोजी पोवाडे यांचा सोमवारी रात्री साडेनऊ वाजता नांदेड येथे मृत्यू झाला असून यांच्यावर मंगळवारी दुपारी निमटेक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.