तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचा कुलसचिवांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न; स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 20:57 IST2024-11-28T20:56:02+5:302024-11-28T20:57:47+5:30
...परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्या दोन प्राध्यापकांनी कुलसचिवांच्या कार्यालयात अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचा कुलसचिवांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न; स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील घटना
नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या दोन प्राध्यापकांनी मानधन न मिळाल्याच्या कारणावरून कुलसचिवाच्या दालनात अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता घडली.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्त्री अध्ययन केंद्र येथे तासिका तत्वावर सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत प्रा. गजानन इंगोले व प्रा.मेघनाथ खडके यांनी मागील चार महिने केलेल्या कामाचा आर्थिक मोबदला वेळोवेळी मिळावा यासाठी वरिष्ठाकडे मागणी केली होती. परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्या दोन प्राध्यापकांनी कुलसचिवांच्या कार्यालयात अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
त्यामुळे उचलावे लागले पाऊल
मागील चार महिन्यापासून विद्यापीठाने आमच्याकडून प्रवेश प्रक्रिया याशिवाय अध्ययनाचे काम करून घेतले, कामाचा मोबदला आम्ही मागत होतो. परंतु स्त्री अध्ययन केंद्राच्या संचालिका यांनी जाणीवपूर्वक आम्हाला मानधन देण्यापासून टाळले. या अन्यायाला कंटाळून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
...प्रा. गजानन इंगोले, सहाय्यक प्राध्यापक.
जाणूनबुजून केले दुर्लक्ष -
केलेल्या कामाचे मानधन मिळावे यासाठी वेळोवेळी कुलगुरू यांना भेटून मागणी केली. याशिवाय आमच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत व्यवस्थापन परिषदेकडे या विषयावर चर्चाही झाली. अध्ययन कक्षाच्या संचालिका डॉक्टर शालिनी कदम यांनी जाणीवपूर्वक आम्हाला डावलण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप आरोप त्यांनी केला आहे. आर्थिक पिळवणूक करणाऱ्या संचालक यांच्याविरुद्ध पोलीस स्थानकात तक्रार करणार असल्याचे प्राध्यापकांनी सांगितले.