गणपूरमध्ये सशस्त्र दरोडा; वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून ऐवज पळवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 18:54 IST2018-11-16T18:53:45+5:302018-11-16T18:54:16+5:30
अर्धापूर तालुक्यातील गणपूर येथे गुरुवारी रात्री एका घरावर दरोडा टाकण्यात आला़

गणपूरमध्ये सशस्त्र दरोडा; वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून ऐवज पळवला
नांदेड :अर्धापूर तालुक्यातील गणपूर येथे गुरुवारी रात्री एका घरावर दरोडा टाकण्यात आला़ दरोडेखोरांनी वृद्ध दाम्पत्याला मारहाण करीत १ लाख ७१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला़ या मारहाणीत संभाजी मोहिते यांना गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़
अर्धापूर- वसमत रस्त्यावर गणपूर येथे गुरुवारी रात्री संभाजी मोहिते हे परिवारासह घरात झोपले होते़ पहाटेच्या सुमारास दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला़मोहिते यांचे घर गावापासून थोड्या अंतरावर आहे़ या ठिकाणी वृद्ध दाम्पत्य आणि लहान मुले होती़ दरोडेखोरांनी रॉड, कोयता आणि चाकुने सर्वांना मारहाण केली़ त्यानंतर घरातील कपाट फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यासह १ लाख ७१ हजारांचा ऐवज लंपास केला़ यावेळी संभाजी मोहिते यांच्यावर हल्ला करण्यात आला़ त्यामध्ये त्यांच्या हाताची नस तुटल्याने ते गंभीर जखमी झाले़
घरात वयस्क आणि लहान बालकेच होती़ त्यामुळे दरोडेखोरांना विरोध करता आला नाही़ घटनेनंतर अर्धापूर पोलिस घटनास्थळी पोहचले़ अप्पर पोलिस अधीक्षक डॉ़अक्षय शिंदे, स्थागुशाचे पोनि़सुनिल निकाळजे, सपोनि पांडूरंग भारती, महादेव मांजरमकर यांनी पाहणी केली़ यावेळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते़ याप्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ दरम्यान, या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे़