भोकर (नांदेड ): तालुक्याने प्रस्तावित केलेल्या विविध २०० कामांच्या टंचाई आराखड्यास मंजुरी मिळाल्यामुळे संभाव्य पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अपुरे पर्जन्यमान व तालुक्यातील सिंचन क्षमता यामुळे उन्हाळ्यात बहुतांश गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यादृष्टीने खा.अशोकराव चव्हाण व जि.प.अध्यक्षा शांताबाई पवार यांच्या उपस्थितीत आ. अमिता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक प्रशासनाने जानेवारी ते जून असा ६ महिन्यांचा ३ कोटी ८ लक्ष रुपयांचा टंचाई आराखडा प्रस्ताव तयार करून मान्यतेसाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता. त्या प्रस्तावातील काही कामे कपात करुन विविध २०० कामांच्या २ कोटी १२ लक्ष ८२ हजार रुपये खर्चाच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे.
यात जानेवारी ते मार्चमध्ये करावयाची कामे अशी (कंसात खर्च) नवीन विंधन विहिरी ४९ (२९.४० लक्ष), नळयोजना विशेष दुरुस्ती १४ (३९.५० लक्ष), पुरक नळयोजना २ (५.०० लक्ष), विंधन विहीर विशेष दुरुस्ती १५ (१.५० लक्ष), विहीर आणि बोअर अधिग्रहण ९५ (३४.२० लक्ष), टँकरद्वारे पाणीपुरवठा ९ (२७ लक्ष), विहीर खोलीकरण/गाळ काढणे १ (५० हजार) तर एप्रिल ते जून महिन्यात विहीर आणि बोअर अधिग्रहण १०२ (३६.७२ लक्ष) आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा १३ (३९ लक्ष) अशाप्रकारे एकूण २०० कामांकरिता २ कोटी १२ लक्ष ८२ हजार रुपयांच्या कामास मंजुरी मिळाली आहे. जानेवारीअखेर तालुक्यातील १६ गावांचे विहीर/ बोअर अधिग्रहणाचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत तर १० गावांत पाहणी करण्यात आली आहे. गरजेनुसार ग्रामस्थांनी अधिग्रहणाच्या मागणीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे करावा, असे सांगण्यात आले आहे.
अत्यल्प पावसामुळे पाणीटंचाईची समस्यादोन वर्षांपूर्वी समाधानकारक पाऊस झाला होता़ यामुळे तालुक्यात गत उन्हाळ्यात टंचाईची तीव्रता कमी होती, परंतु मागील पावसाळ्यात सिंचनयोग्य पाऊस न झाल्यामुळे या उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना तालुक्यास करावा लागणार असल्याचे जाणकार बोलत आहेत.