लोहा राष्ट्रवादी तालुकाध्यक्षाचा जीवन संपविण्याचा प्रयत्न; व्हिडीओ व्हायरल
By प्रसाद आर्वीकर | Updated: September 19, 2023 16:59 IST2023-09-19T16:59:10+5:302023-09-19T16:59:45+5:30
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे

लोहा राष्ट्रवादी तालुकाध्यक्षाचा जीवन संपविण्याचा प्रयत्न; व्हिडीओ व्हायरल
- गोविंद कदम
लोहा : माझी ही शेवटची सिगारेट असून, मी आत्महत्या करीत आहे, असे म्हणत गळ्यातील दोरी फॅनला बांधत असतानाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) लोहा तालुकाध्यक्ष रमेश माळी यांचा व्हिडीओ १८ सप्टेंबर रोजी व्हायरल झाला. या प्रकारानंतर पोलिसांनी माळी यांच्या विरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश माळी यांचा हा व्हिडीओ मंगळवारी समाज माध्यमांवर व्हायरल झाला. ‘मला माझ्या पत्नीचा, मुलाचा त्रास नसून, माझे मेहुणे प्रवीण वंजे, पवन वंजे हे मला मानसिक त्रास देत असून, त्यांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करीत असल्याचे या व्हिडीओत त्यांनी म्हटले आहे. समाज माध्यमांवर हा व्हिडीओ व्हायरल झाला.
लोहा पोलिस ठाण्यात नव्याने रुजू झालेले ओमकांत चिंचोलकर यांच्या हाती हा व्हिडीओ लागला. त्यानंतर पोलिस कर्मचारी सदाशिव जामकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहा पोलिस ठाण्यात रमेश माळी यांच्या विरोधात १८ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण हालसे तपास करीत आहेत.