आंबेडकरी साहित्यातून क्रांतीची प्रेरणा मिळते -प्रा. माधव सरकुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:16 IST2021-04-14T04:16:26+5:302021-04-14T04:16:26+5:30

नांदेड - साहित्यिक तथा विद्वानांच्या प्रतिभा मुक्त असल्या पाहिजेत. त्या व्यवस्थेच्या गुलाम असता कामा नयेत. साहित्य हे ...

Ambedkar's literature inspires revolution - Prof. Madhav Sarkunde | आंबेडकरी साहित्यातून क्रांतीची प्रेरणा मिळते -प्रा. माधव सरकुंडे

आंबेडकरी साहित्यातून क्रांतीची प्रेरणा मिळते -प्रा. माधव सरकुंडे

नांदेड - साहित्यिक तथा विद्वानांच्या प्रतिभा मुक्त असल्या पाहिजेत. त्या व्यवस्थेच्या गुलाम असता कामा नयेत. साहित्य हे समाज घडविण्याचे आणि लढवण्याचे काम करते. चमडीबचाव आणि सावधगिरीचे साहित्य कुचकामी असते. असे साहित्यिक भूमिकाहीन असतात. त्याउलट आंबेडकरी साहित्य हे संघर्षशील आहे, त्यातून क्रांतीची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन आंबेडकरी विचारवंत प्रा. माधव सरकुंडे यांनी केले.

ते डॉ. आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत बोलत होते. यावेळी संयोजक प्रशांत वंजारे, समन्वयक गंगाधर ढवळे, साहित्यिक अशोक बुरबुरे, सज्जन बरडे, अरविंद निकोसे, संजय मोखडे, सुनील कुमरे, साहेबराव पाईकराव, दीपक भालेराव आदींची उपस्थिती होती. अ. भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने या जयंतीनिमित्त सात दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे उद्‌घाटन ‘उपरा’कार पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या हस्ते झाले. व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प यवतमाळ येथील प्रा. माधव सरकुंडे यांनी गुंफले. ‘आजच्या साहित्यिक, बुद्धीजीवींची जबाबदारी काय?’ या विषयावर ते म्हणाले की, पांढरे कागद काळे करणे म्हणजे साहित्यलेखन नव्हे. हस्तिदंती मनोऱ्यात बसून कल्पनेचे इमले बांधणारे साहित्य विचार प्रसवनारे नसते. कारण सत्य समजले की, माणूस स्वस्थ बसत नाही. तो अन्यायाच्या विरोधात न्यायाच्या प्रतिष्ठापनेसाठी साहित्य निर्मिती करतो. परिवर्तनासाठी करारी, धाडसी आणि कणखर भूमिका घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.

चौकट....

मोदी सरकार धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या विरोधात

स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, समाजवाद, विज्ञानवाद ही भारतीय संविधानाची वैशिष्ट्य आहेत; परंतु मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून लोकांच्या मनातील धर्मनिरपेक्षतेची भावना काढून टाकण्याच्या कामाला लागले आहे. खाजगीकरण, आरक्षणाचे राजकारण, निर्गुंतवणुकीकरण, नोकऱ्यांची व्यपगतता आणि धार्मिक तुष्टीकरणाचे काम हे सरकार करीत असल्याचेही प्रा. माधव सरकुंडे म्हणाले.

Web Title: Ambedkar's literature inspires revolution - Prof. Madhav Sarkunde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.