अनेक महिन्यांच्या विश्रांतीनंतर मानव विकास मिशनच्या बसेसही विद्यार्थ्यांच्या सेवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:09 IST2021-02-05T06:09:40+5:302021-02-05T06:09:40+5:30
दरम्यान, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसेस बंद होत्या. त्या शाळा सुरू झाल्याने पुन्हा नव्याने सुसाट धावत आहेत. आजघडीला जिल्ह्यात मानव ...

अनेक महिन्यांच्या विश्रांतीनंतर मानव विकास मिशनच्या बसेसही विद्यार्थ्यांच्या सेवेत
दरम्यान, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसेस बंद होत्या. त्या शाळा सुरू झाल्याने पुन्हा नव्याने सुसाट धावत आहेत. आजघडीला जिल्ह्यात मानव विकास मिशनअंतर्गतच्या ६३ बसेस धावत आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने शालेय विद्यार्थिनींना शासनाच्या सहकार्यातून मोफत बससेवा दिली जाते. त्यासाठी शासनाच्यावतीने खास उपक्रम राबवून मानव विकास मिशनअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र बसेसही दिलेल्या आहेत. कोरोनामुळे अनेक महिन्यांपासून बंद असलेली एसटीसेवा पुन्हा नव्याने सुरू झाली असली, तरी अनेक ठिकाणची बससेवा अद्यापपर्यंत बंदच आहे. दरम्यान, शाळा सुरू झाल्याने मानव विकास मिशनच्या बसेससाठी ठरवून दिलेल्या मार्गावर बसेस सोडण्यात आल्या आहेत. जवळपास ६३ बस असून, त्यातील १४ बस बिलोली, धर्माबाद आगाराअंतर्गत धावतात. तसेच नांदेड आगाराअंतर्गत १०, देगलूर - ७ बस, हदगाव - ७, किनवट - ७, कंधार - ४, तर उमरी आणि भोकर तालुक्यात १४ बस धावत आहेत. त्याचबरोबर मुलांना प्रवास करण्यासाठी असलेल्या सवलत पास वितरणाचेही काम सुरू झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अपेक्षित ठिकाणी प्रवास करून शिक्षण घेता येत आहे.
नांदेडसह काही आगारात आजही दुर्गम भागातील बससेवा सुरू झालेली नाही. त्यात माहूर, किनवट, कंधार, बिलोली तालुक्यातील अनेक गावांचा समावेश आहे. तसेच बेलसर, चाभरा, माळकोठा आदी गावांतील बससेवा अद्यापपर्यंत सुरू नाही. त्यामुळे ज्या गावातील विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी ये-जा करतात, त्या ठिकाणी बससेवा सुरू करण्याची मागणी होत आहे.
काेरोनानंतर बससेवा पूर्ववत होण्याच्या मार्गावर
नांदेड आगारातून कोरोनापूर्वी नियमितपणे ११५ बसच्या माध्यमातून विविध फेऱ्या केल्या जात होत्या. परंतु, कोरोनामुळे लाॅकडाऊन आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करत आजपर्यंत ९२ बसेस रस्त्यावर धावत आहेत. परंतु, मानव विकास मिशनच्या पूर्वीप्रमाणेच दहा बसेस शालेय मुलींच्या सेवेत धावत आहेत.
पास देण्यास विलंब करू नये
शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटीची सवलत पास देण्यासाठी विनाकारण विलंब केला जात आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर तक्रारी कराव्या लागत आहेत. विद्यार्थ्यांना पासेस देण्यासाठी कोणत्याही अटी न लावता त्यांना तत्काळ पासेस उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
- आकाश पाटील, विद्यार्थी
महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेला आहे. परीक्षा व इतर कामांसाठी शहरी भागात जावे लागते. तसेच महाविद्यालये सुरू न झाल्याने खासगी क्लासेस लावले आहेत. परंतु, आगारातून पासेस दिले जात नाहीत. महाविद्यालये कधी सुरू होतील तेव्हा सुरू होतील. परंतु, आयटीआय तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पासेस उपलब्ध करून द्यावेत.
- वैभव कल्याणकर, विद्यार्थी
प्रवासी तसेच विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार बससेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच रेल्वेच्या पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे लांब पल्ल्याच्या ठिकाणी बससेवा सुरू केली आहे. काही बस, त्यांचे चालक, वाहक हे मुंबईमध्ये कार्यरत आहेत. ते परतल्यानंतर पुन्हा जिल्हाअंतर्गत बसेसची संख्या वाढेल.
- वर्षा येरेकर, आगारप्रमुख, नांदेड