accuse arrested with sharp weapons | धारदार हत्यारांसह आरोपी जेरबंद
धारदार हत्यारांसह आरोपी जेरबंद

ठळक मुद्देग्रामीण पोलिसांची कामगिरी२५ धारदार हत्यारे जप्त

नवीन नांदेड : ग्रामीण ठाण्याच्या हद्दीतील विकासनगर, जुना कौठा येथून विशेष गुन्हे शोधपथकाने एका धारदार तलवारीसह सुमारे २० ते २५ धारदार लोखंडी खंजीर असा एकूण तब्बल १२ ते १५ हजारांचा शस्त्रसाठा जप्त केला आहे. ही कारवाई २७ एप्रिल रोजी पहाटे करण्यात आली़
गुन्हे शोध पथकातील पोउपनि.शेख जावेद, सहा. पोउपनि. एकनाथ देवके, नापोकॉ पवार, पोकॉ कांबळे व कोरनुळे हे २६ एप्रिल रोजी सायंकाळी पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान, एका गुप्त बातमीदाराकडून जुना कौठा येथील विकासनगर परिसरातील गाडगेबाबा सोसायटी येथे एक इसम हा त्याच्या घरी लोखंडी धातूची तलवार व खंजीर बनवून विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़
दरम्यान, खबऱ्याकडून उपरोल्लेखित माहिती समजताच पोउपनि. शेख तसेच त्यांचे अन्य सहकारी कर्मचारी हे पो. नि. डी. जी. चिखलीकर यांच्या मार्गर्शनाखाली सापळा रचून २७ एप्रिल रोजी पहाटे सव्वाएक ते दीड वाजेदरम्यान, जुना कौठा परिसरात धाड टाकली. धाडीदरम्यान, घटनास्थळी एका घरासमोर एक इसम लोखंडी धातूचे खंजीर बनवित असताना आढळून आला आहे. त्याचवेळी, पोउपनि. शेख जावेद यांनी त्याची चौकशी केली असता, त्याने आपले नाव ठाकूरसिंग देशमुखसिंग टाक (रा.किशनसिंग बावरी यांच्या घरी, जुना कौठा, नांदेड) असे सांगितले़
त्याचवेळी, आरोपी ठाकूरसिंग टाकने आपण घरमालक किशनसिंग बावरी याच्या सांगण्यावरून त्यांच्याकडे मजुरीने खंजीर बनविण्याचे काम करीत असल्याची माहिती पोलिसांना दिली़ दरम्यान,पोलिसांनी या प्रकरणाचा मुख्य आरोपी किशनसिंघ भगवानसिंघ बावरी यांच्या घराची झडती घेतली असता, त्या घरातील पलंगाखाली लोखंडी धातूची एका धारदार तलवारीसह २० ते २५ लोखंडी धारदार खंजीर तसेच खंजीर बनविण्याचे विविध साहित्यही आढळून आले आहे. ज्यामध्ये लोखंडी पट्ट्या व भारत कंपनीचे एक गॅस सिलिंडर, गॅसचा पाईप, पितळी बर्नर तसेच हातोडा आदी तब्बल १२ ते १५ हजार रूपये किमतीच्या साहित्याचा समावेश आहे, अशी माहिती पोउपनि. शेख जावेद व ठाणे अंमलदार सपोउपनि. गणपतराव गिते यांनी दिली. ठाकूरसिंग टाक यास जेरबंद केले आहे, तर मुख्य आरोपी किशनसिंग भगवानसिंग बावरी हा फरार आहे़
कौठा भागात लुटीच्या घटना
शहरातील कौठा परिसरात गेल्या काही दिवसांपासून लुटीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे़ दुचाकीवरुन जाणाऱ्यांना हे आरोपी टार्गेट करीत आहेत़ चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील ऐवज लंपास करण्यात येत आहे़ सातत्याने या रस्त्यावर या घटना घडत आहेत़ त्यामुळे पोलिसांनी केलेल्या कारवाईतून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे़


Web Title: accuse arrested with sharp weapons
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.