प्रेमाचा थरारक शेवट; मनुतांड्यावरील शामकाबाईचा मृत्यू 'ऑनर किलिंग'च; पित्याला अटक

By श्रीनिवास भोसले | Published: August 10, 2023 05:45 PM2023-08-10T17:45:04+5:302023-08-10T17:51:23+5:30

मुलीचा खून केल्यानंतर दोन तासांत उरकले अंत्यसंस्कार; आईनेच उघड केला खुनाचा घटनाक्रम

A thrilling ending to a love affair; Shamkabai's death on Manutandya is 'honour killing'; Father arrested | प्रेमाचा थरारक शेवट; मनुतांड्यावरील शामकाबाईचा मृत्यू 'ऑनर किलिंग'च; पित्याला अटक

प्रेमाचा थरारक शेवट; मनुतांड्यावरील शामकाबाईचा मृत्यू 'ऑनर किलिंग'च; पित्याला अटक

googlenewsNext

- गणेश जाधव
बाराहाळी (नांदेड) :
जिल्ह्यातील मुखेड तालुक्याच्या मनुतांडा येथे २ ऑगस्ट रोजी अल्पवयीन शामकाबाईचा झालेला मृत्यू हा आत्महत्या नसून वडिलांनीच केवळ प्रतिष्ठेसाठी केलेले ‘ऑनर किलिंग’ असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. मुलीच्या खुनात आई फिर्यादी झाली आणि पित्याला मुक्रमाबाद पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली.

पंचफुलाबाई अण्णाराव राठोड (४२, रा. मनुतांडा) यांच्या तक्रारीवरून मुक्रमाबाद पोलिसांनी बुधवारी भादंविचे ३०२, २०१, ५०६ कलमाखाली गुन्हा दाखल केला. आरोपी अण्णाराव राठोड याला अटक करून न्यायालयापुढे हजर केले गेले. दरम्यान अप्पर पोलिस अधीक्षक अभिनाशकुमार यांनी मनुतांड्याला घटनास्थळी भेट दिली. २ ऑगस्ट रोजी शामकाबाई अण्णाराव राठोड (१६) या मुलीच्या ‘ऑनर किलिंग’ची चर्चा पुढे आल्यानंतर मुक्रमाबाद पोलिसांनी मनुतांडा गाठला. तेव्हा शामकाबाई हिने गळफास लावून आत्महत्या केल्याचे सांगितले गेले.

सकाळी ८:३० वाजता आत्महत्या, दोन तासात प्रेत जाळून अंत्यसंस्कार व त्यानंतरच्या दोन तासात पंचक्रोशीत ऑनर किलिंगची चर्चा असा हा घटनाक्रम होता. पोलिसांनी मृतदेह जाळलेल्या ठिकाणाहून शामकाबाईची हाडे व राखेचे नमुने घेतले होते. दोन डझनावर बयाण घेऊनही या प्रकरणाबाबत कुणीही बोलत नव्हते. अखेर पोलिसांनी संशयित आरोपी अण्णाराव याच्या दोन भावांचे बयाण घेतले. त्यानंतर संशयिताची पत्नी पंचफुलाबाई हिला विश्वासात घेतले असता तिने अश्रूंना वाट मोकळी करत झालेला थरारक प्रकार कथन केला. 

तिने पोलिसांना सांगितले की, राजुरा तांडा येथील तुषार चव्हाण याच्यासोबत विवाह करण्याचा शामकाबाईचा हट्ट होता. परंतु या विवाहाला कुटुंबीयांचा विरोध होता. वारंवार समजावूनही ती ऐकण्यास तयार नव्हती. २ ऑगस्टला बुधवारी सकाळी अण्णाराव यांनी मुलगी शामकाबाईला एकटीलाच घरात ठेवले. तिला पुन्हा विचारणा केली. मात्र ती तुषारसोबत विवाहाचा हट्ट धरून होती. त्यामुळे संतापलेल्या अण्णाराव याने कोयत्याने मानेवर व हातावर वार करून शामकाबाईचा खून केला. घरातील रक्त पुसून टाकले. रक्ताने माखलेले तिचे कपडे जाळून टाकले व त्यानंतर आत्महत्येचा देखावा निर्माण करून तातडीने प्रेत जाळत तिचे अंत्यसंस्कार उरकले. 

या घटनेची वाच्यता होऊ नये म्हणून कुटुंबीयासह शेजाऱ्यांनाही धमकी दिली गेली होती. अखेर पंचफुलाबाईच्या फिर्यादीवरून मुक्रमाबाद पोलिसांनी खून व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करून अण्णाराव गोविंद राठोड (४५) याला अटक केली. मुक्रमाबादचे ठाणेदार भालचंद्र तिडके या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Web Title: A thrilling ending to a love affair; Shamkabai's death on Manutandya is 'honour killing'; Father arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.