मॉडेल स्कूलसाठी आठ कोटी

By Admin | Updated: July 19, 2014 00:51 IST2014-07-19T00:21:19+5:302014-07-19T00:51:05+5:30

राजेश गंगमवार, बिलोली केंद्र सरकारच्या योजनेतून होणाऱ्या तालुका मॉडेल स्कूलसाठी आठ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली़ शहर व परिसरात शासकीय गायरान जागा उपलब्ध नसल्याने

8 million for the model school | मॉडेल स्कूलसाठी आठ कोटी

मॉडेल स्कूलसाठी आठ कोटी

राजेश गंगमवार, बिलोली
केंद्र सरकारच्या योजनेतून होणाऱ्या तालुका मॉडेल स्कूलसाठी आठ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली़ शहर व परिसरात शासकीय गायरान जागा उपलब्ध नसल्याने बडूर-बामणी (फाटा) मार्गावर हा शैक्षणिक उपक्रम येत्या वर्षात पूर्ण होणार आहे़ सामाजिक आरक्षणानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश असून मुलींसाठी निवासाची सोय राहणार आहे़
केंद्र शासनाकडून राष्ट्रीय-स्त्री साक्षरतेच्या प्रमाणाचे सर्वेक्षण करण्यात आले़ जिल्ह्यातील बिलोली, धर्माबाद, उमरी व मुदखेड तालुक्यात हे प्रमाण सरासरीपेक्षा कमी आढळले़ केंद्र सरकारकडे राज्य शासनाने अहवाल पाठविल्यानंतर चार तालुक्यात मॉडेल स्कूलसाठी परवानगी देण्यात आली़ सद्य:स्थितीत अशा शाळा जिल्हा परिषदांच्या इमारतीमध्ये सुरू करण्यात आल्या़ प्रारंभी सहावी वर्गापासून वर्ग सुरू करून नैसर्गिक वाढ करण्यात आली़ मागच्या दोन वर्षांत सुरू झालेल्या वर्गाची वाढ होवून आठवा वर्ग चालू आहे, अशा शाळांत शिकवणी करण्यासाठी शिक्षण उपसंचालकच्या निवडीनुसार सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक करण्यात आली़ तर काही विषयांकरिता जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहे़ सेमी-इंग्लिशचा अभ्यासक्रम सुरू असून राज्य शासनाच्या पाठ्यपुस्तकावर आधारित शिकवणी आहे़ जागेचा प्रश्न निकाली लागल्याने प्रस्तावित उपक्रमांसाठी आठ कोटी रुपये मंजूर झाले आहेत़ नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर आधारित सहावी ते बारावीपर्यंत येथे शिक्षण घेता येणार आहे़ मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह असून निवासी शाळा राहणार आहे़ शैक्षणिक सुविधा अंतर्गत शिकवणीच्या प्रशस्त खोल्या, संगणक कक्ष, विज्ञान प्रयोगशाळा, इनडोअर स्टेडियम, मोठे क्रीडांगण, वैज्ञानिक म्युझियम, शिक्षकांसाठी क्वार्टर्स आदींसाठी या योजनेत प्रावधान आहे़ संपूर्ण बांधकामासाठी आठ कोटी रुपये मंजूर झाले आहेत़ आगामी वर्षात हे काम सुरू केले जाणार आहे़ बडूर-बामणी परिसरातील ही जागा निसर्गरम्य वातावरणात असून उंचावर आहे़ त्यामुळे बिलोली-देगलूर या मार्गावर शैक्षणिक प्रकल्पामुळे वैभव प्राप्त होणार आहे़ विशेष म्हणजे बिलोली शहर व परिसरात शासकीय गायरान व भूखंड उपलब्ध आहे़ पण नियमबाह्य, बेकायदेशीर, खाजगी लोकांचा कब्जा असल्याने ही योजना दहा किलोमीटर लांब गेली आहे़
किमान सात एकर जमीन आवश्यक
मॉडेल स्कूलसाठी किमान सात एकर जागा आवश्यक आहे़ केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार बिलोली शहर व परिसरात शासकीय मोकळ्या गायरान जागेचा शोध घेण्यात आला़ जागा मिळत नसल्याचा पत्रव्यवहार झाल्यानंतर तालुक्यात कुठे-कुठे शासकीय गायरान उपलब्ध आहे, यासंबंधी महसूल विभागाने माहिती घेतली़ बिलोलीपासून दहा कि़मी़ अंतरावर असलेल्या बडूर बामणी (फाटा) भागात सात एकर गायरान निश्चित करण्यात आले़ सात एकर जमिनीचा फेरफार मॉडेल स्कूलच्या नावे करून सातबारावर नोंदी घेण्यात आल्या व जागेचा अहवाल केंद्राकडे पाठविण्यात आला़
सदरील मॉडेल स्कूलचा प्रकल्प गतवर्षीच प्रारंभ होणार होता़ पण जागेचा प्रश्न उशिरा निकाली लागला़ राष्ट्रीय स्त्री-साक्षरतेच्या आधारावर मॉडेल स्कूलची योजना केंद्राने हाती घेतली आहे़ राज्यात अशा ४३ शाळांसाठी मंजुरी मिळाली असून प्रत्येक मॉडेल स्कूल सारखेच राहणार आहे़ बामणी परिसरातील जागेचा ताबा घेण्यात आला आहे़ आता लवकरच बांधकाम सुरू करण्याची प्रक्रिया सुरू होईल़ जिल्ह्यात अशा चार शाळा आहेत - माधव सलगर, गटशिक्षण अधिकारी.

Web Title: 8 million for the model school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.