नांदेड : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ७८ जणांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे बँकेच्या २१ जागांसाठी आता १४३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यापैकी कितीजण उमेदवारी मागे घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. निवडणुकीपूर्वीच जिल्हा बँकेच्या रणधुमाळीला, राजकीय चिखलफेकीला सुरुवात झाली होती. या निवडणुकीत २ मार्च रोजी तिघांनी उमेदवारी दाखल केली होती. ३ मार्च रोजी ३२ तर ४ मार्चला ४६ जणांचे अर्ज प्राप्त झाले होते. गुरुवारी अनेकांनी उमेदवारी दाखल केली होती. त्यातच शुक्रवारी अखेरच्या दिवशी मात्र सर्वाधिक ७८ जणांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे २१ जागांसाठी आता १४३ उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी मागे घेण्यासाठी २३ मार्चपर्यंतची मुदत आहे. याकाळात आपल्या विरोधकांनी माघार घ्यावी, यासाठी मनधरणी करण्यात येणार आहे. २ एप्रिल रोजी बँकेसाठी मतदान होणार असून, ४ एप्रिल रोजी मतमोजणी होईल. ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची झाल्यामुळे चुरस निर्माण झाली आहे.
शेवटच्या दिवशी ७८ जणांचा अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:17 IST