जिल्ह्यात ७४ हजार ८१३ रक्त नमुने तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:18 IST2021-04-27T04:18:31+5:302021-04-27T04:18:31+5:30
नांदेड : पुढील काळात हिवताप आजाराचा उद्रेक होऊ नये म्हणून आरोग्य विभागाकडून सर्वप्रकारचे नियोजन करण्यात आले असून, हिवताप आजारावर ...

जिल्ह्यात ७४ हजार ८१३ रक्त नमुने तपासणी
नांदेड : पुढील काळात हिवताप आजाराचा उद्रेक होऊ नये म्हणून आरोग्य विभागाकडून सर्वप्रकारचे नियोजन करण्यात आले असून, हिवताप आजारावर मात करण्यासाठी नागरिकांचे ७४ हजार ८१३ रक्त नमुने तपासण्यात आले असून, एकही रूग्ण हिवतापाचा आढळलेला नाही.
जागतिक आरोग्य संघटनेने २५ एप्रिल हा दिवस ‘जागतिक हिवताप दिन’ म्हणून घोषित केला आहे. भविष्यात या आजाराचा उद्रेक होऊ नये म्हणून वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने थोडक्यात माहिती डॉ. आकाश देशमुख, जिल्हा हिवताप अधिकारी, नांदेड यांनी दिली. हिवताप या आजाराचा प्रसार अँनाफिलस डासाच्या मादीमार्फत होतो. या डासाची उत्पत्ती स्वच्छ साठूून राहिलेल्या पाण्यात होते. उदा. भातशेती, स्वच्छ पाण्याची डबकी, नाले, नदी पाण्याच्या टाक्या, कालवे इत्यादी मध्ये होते. या आजाराची लक्षणे थंडी वाजून ताप येणे, ताप हा सततचा असू शकतो किंवा एक दिवस आड येऊ शकतो, तापानंतर घाम येऊन अंग गार पडणे, डोके दुखणे व बऱ्याचवेळा उलट्या होतात. कोणताही ताप हा हिवताप असू शकतो. म्हणून प्रत्येक ताप रुग्णाने आपला रक्तनमुना नजिकच्या ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून तपासून घ्यावा. हिवताप दूषित रक्तनमुना आढळल्यास वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्याने दिल्या जाणाऱ्या क्लोरोक्विन व प्रायमाक्विन गोळ्यांचा औषधौपचार घ्यावा. जागतिक हिवताप दिन २५ एप्रिल रोजी जिल्हा हिवताप कार्यालय, नांदेड येथे साजरा करण्यात आला. यावेळी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी गणेश सातपुते, माधव कोल्हे, सत्यजीत टिप्रेसवार, अशोक शिंदे, राजप्पा बाबशेट्टे, रवींद्र तेलंगे, माधव वांगजे उपस्थित होते.
चौकट-
मागील तीन वर्षांत नांदेड जिल्ह्यातील हिवताप आजारासाठी रक्तनमुने तपासले. सन २०१८मध्ये ४ लाख २६ हजार ६८६ रक्तनमुने तपासले, यावेळी ४ पी. व्ही. रुग्ण आढळले. २०१९मध्ये ४ लाख २८ हजार ६२३ रक्तनमुने तपासले. २०२०मध्ये २ लाख ७४ हजार १८३ रक्तनमुने तपासले तर मार्च - २०२१ अखेर ७४ हजार ८१३ रक्तनमुने तपासले असून, एकही रुग्ण आढळलेला नाही.