नांदेडातील ७ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले; सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2022 17:24 IST2022-02-25T17:23:36+5:302022-02-25T17:24:30+5:30
रशिया आणि युक्रेन या देशात युद्ध सुरू झाले असून या परिस्थितीत युक्रेनमध्ये अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील नागरिकांची माहिती घेतली जात आहे.

नांदेडातील ७ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले; सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
नांदेड : जिल्ह्यातील ७ विद्यार्थी युक्रेनमध्ये असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. यामध्ये ६ युवक आणि एका युवतीचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याची माहितीही त्यांनी दिली.
रशिया आणि युक्रेन या देशात युद्ध सुरू झाले असून या परिस्थितीत युक्रेनमध्ये अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील नागरिकांची माहिती घेतली जात आहे. त्यात पालकांनी प्रशासनाशी संपर्क साधून ही माहिती दिली आहे. ही सर्व सातही विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी युक्रेनमध्ये आहेत. ते सध्या सुरक्षित असल्याचेही त्यांनी आपल्या पालकांना कळवले आहे.
दरम्यान, युक्रेनमध्ये असलेल्या नागरिकांच्या नातेवाइकांनी जवळच्या तहसील कार्यालयात संपर्क करून अडकलेल्या नागरिकांबाबत माहिती द्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी केले आहे. युद्धाच्या परिस्थितीत नागरिकांना सुखरूप परत मायदेशी आणण्यासाठी देशपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
नांदेड जिल्ह्यातील नागरिक युक्रेनमध्ये अडकले असतील तर त्यांच्या नातेवाइकांनी जवळच्या तहसील कार्यालयास किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन टोल फ्री क्रमांक १०७७ किंवा ०२४६२-२३५०७७ या क्रमांकावर संपर्क साधावा. त्याचवेळी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने नागरिकांच्या माहितीसाठी हेल्पलाइन नंबर १८००११८७९७ या व इतर क्रमांकासह ई-मेल आयडीवर संपर्क करण्यासही कळवले आहे.