नांदेडमध्ये ४ टन प्लास्टिक जप्त, मनपा आयुक्तांनी केली कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 17:36 IST2018-06-26T17:35:28+5:302018-06-26T17:36:04+5:30
नांदेड महापालिकेच्या वतीने सुरु असलेल्या प्लास्टिक बंदी अंमलबजावणी मोहिमेत आज दुपारी महापालिकेने शहरातील जुना मोंढा भागात मनपा आयुक्तांच्या पथकाने कारवाई केली.

नांदेडमध्ये ४ टन प्लास्टिक जप्त, मनपा आयुक्तांनी केली कारवाई
नांदेड : नांदेड महापालिकेच्या वतीने सुरु असलेल्या प्लास्टिक बंदी अंमलबजावणी मोहिमेत आज दुपारी महापालिकेने शहरातील जुना मोंढा भागात मनपा आयुक्तांच्या पथकाने कारवाई केली. यात महाराजा रणजीतसिंघ मार्केटमधील प्लास्टिकच्या दोन गोडावून मधील जवळपास ४ ते ५ टन प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या.
महापालिकेच्या वतीने तीन दिवसांपासून प्लास्टिक बंदी निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे. आज महापालिकेचे आयुक्त लहुराज माळी यांच्यासह उपायुक्त माधवी मारकड, सहायक आयुक्त गुलाम सादिक, डॉ. फरहतउल्ला मिर्झा बेग, वसीम तडवी, अतिक अन्सारी आदीनी महाराजा रणजीतसिंघ मार्केटमध्ये अग्रवाल बॅग या प्लास्टिक होलसेलर दुकानावर धाड टाकली.
व्यापाऱ्यास २५ हजाराचा दंड
या धाडीत जवळपास 4 ते 5 टन प्लास्टिक जप्त केले. सतीश अग्रवाल या प्लास्टिक व्यापाऱ्यास 25 हजाराचा दंड ठोठावला आहे. विशेष म्हणजे सदर व्यापाऱ्याला यापूर्वी प्लास्टिकबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनदा दंड ठोठावला आहे. प्लास्टिक बंदी नियमात पहिल्या कारवाईस 5 हजार, दुसऱ्या कारवाईस 10 हजार, तिसऱ्या वेळी 25 हजार तर चौथ्यांदा सापडल्यास गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे.