महावितरणच्या मुदखेड उपविभागांतर्गत येणाऱ्या आम्राबाद येथे आयोजित मेळाव्यामध्ये महाकृषी ऊर्जा अभियान २०२० ची सविस्तर माहिती उपस्थित ग्रामस्थांना देताना मुख्य अभियंता पडळकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या वीजपुरवठ्याच्या विविध अडचणींचा अभ्यास करून त्यांना शाश्वत शेती करता यावी या उद्देशाने या नवीन अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत ३० मीटरच्या आत असलेल्या कृषी ग्राहकांना तात्काळ वीज जोडणी देण्यात येणार आहे, तसेच ज्या कृषी पंप अर्जदाराचे अंतर लघुदाब वाहिनीच्या २०० मीटर आत आहे व रोहित्रावर पर्याप्त क्षमता उपलब्ध आहे, अशा नवीन कृषी पंप ग्राहकांना तीन महिन्यांच्या आत नवीन जोडणी देण्यात येईल. २०० ते ६०० मीटरच्या आत असलेल्या कृषी ग्राहकांना उच्चदाब वितरण प्रणालीचा पर्याय उपलब्ध असणार आहे.
नांदेड ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता आर.पी. चव्हाण यांनीही माहिती दिली. यशस्वीतेसाठी उपविभागीय अभियंता पंकज देशमुख, तसेच लेखा विभागाचे अधिकारी, जनमित्र यांनी परिश्रम घेतले.
चौकट
कृषी पंपधारकांनी भरले १ कोटी १७ लाख रुपये
ऊर्जा विभागाच्या वतीने प्रजासत्ताक दिनापासून राज्यभरात सुरू करण्यात आलेले महा कृषी ऊर्जा अभियान २०२० हे खऱ्या अर्थाने शेकऱ्यांसाठी नवसंजीवनी देणारे ठरणार आहे. या अभियानांतर्गत वीजजोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना नवीन वीजजोडणी, तसेच थकबाकीदार शेतकऱ्यांना थकबाकीमुक्त करण्यासाठी थकीत रकमेवरील विलंब आकार माफ व व्याजामध्ये सवलत मिळणार आहे. या अभियानांतर्गत नांदेड परिमंडळातील २९ जानेवारीपर्यंत २४४ शेतकऱ्यांना नवीन वीज जोडणीही दिली आहे. त्याचबरोबर थकबाकीदार कृषी पंपधारकांनी १ कोटी १७ लाख रुपयांची थकबाकी भरून महा कृषी ऊर्जा अभियानाचा लाभ घेतल्याचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकरांनी सांगितले.