संवाद मेळाव्यात ३३ शेतकऱ्यांनी ४ लाख ९१ हजार रुपयांचा वीज बिल भरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:12 IST2021-02-22T04:12:53+5:302021-02-22T04:12:53+5:30
नांदेड : महाकृषी ऊर्जा अभियान हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असून, वीज जोडणी धोरणासोबतच अनेक वर्षांपासून थकीत कृषिपंपांचे वीज ...

संवाद मेळाव्यात ३३ शेतकऱ्यांनी ४ लाख ९१ हजार रुपयांचा वीज बिल भरणा
नांदेड : महाकृषी ऊर्जा अभियान हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असून, वीज जोडणी धोरणासोबतच अनेक वर्षांपासून थकीत कृषिपंपांचे वीज बिल कोरे करण्याची नामी संधी आहे. थकीत बिलापैकी ५० टक्के भरून उर्वरित ५० टक्के रक्कम ही पूर्णपणे माफ होणार आहे. त्यामुळे हे केवळ अभियान नसून शाश्वत शेतीची स्वप्नपूर्ती करणारे अभियान आहे. याचा सर्व शेतकऱ्यांनी फायदा घेवून कृषिपंपांची थकबाकी कोरी करावी, असे आवाहन मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी केले आहे. या संवाद मेळाव्यात ३३ शेतकऱ्यांनी ४ लाख ९१ हजार रुपयांचा वीज बिल भरणा केला.
महाकृषी ऊर्जा अभियानासंदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी उमरी उपविभागातील शिंदी या गावात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी शिंदी गावाचे सरपंच प्रभाकर पाटील पुयड, भोकर विभागाचे कार्यकारी अभियंता मोहन गोपूलवाड, उपकार्यकारी अभियंता बोडके, गोविंदराव पाटील शिंदीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पडळकर म्हणाले, महाकृषी ऊर्जा अभियानात पाच वर्षांपूर्वीच्या सर्व उच्च व लघुदाब कृषी पंप ग्राहक तसेच उपसा जलसिंचन योजनेतील चालू व विलंब आकार शंभर टक्के माफ करण्यात आला आहे. तसेच पाच वर्षांपर्यंतच्या थकबाकीवरील विलंब आकार शंभर टक्के माफ करून व्याज हे १८ टक्क्यांऐवजी त्या त्या वर्षाच्या खेळत्या भांडवलावरील व्याज दरानुसार आकारण्यात येत आहे. त्याच त्याचबरोबर वसूल झालेल्या बिलातील ३३ टक्के रक्कम संबंधित ग्रामपंचायत व ३३ टक्के रक्कम संबंधित जिल्ह्यातील विद्युत यंत्रणांच्या सक्षमीकरणासाठी वापरली जाणार आहे. त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेत आपली थकबाकी कोरी करावी.
चौकट
शिंदी ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी या उद्देशाने सौर कृषी वीजवाहिनीसाठी ४० एकर गायरान जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल सरपंच प्रभाकर पाटील पुयड यांच्यासह सर्व सदस्यांचे पडळकर यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी मुख्य अभियंता पडळकर यांनी केलेल्या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद देत ३३ शेतकऱ्यांनी ४ लाख ९१ हजार रुपयांचा थकीत वीज बिल भरणा केला.