नांदेड - देगलूर बस अपघातात १५ जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 00:23 IST2018-06-17T00:23:36+5:302018-06-17T00:23:45+5:30
नांदेडहून देगलूरला जाणारी बस ट्रकच्या धडकेने उलटली. यामध्ये चालक, वाहक यांच्यासह जवळपास १५ प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी सकाळी नांदेड शहराजवळील धनेगाव चौकात घडली.

नांदेड - देगलूर बस अपघातात १५ जण जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : नांदेडहून देगलूरला जाणारी बस ट्रकच्या धडकेने उलटली. यामध्ये चालक, वाहक यांच्यासह जवळपास १५ प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी सकाळी नांदेड शहराजवळील धनेगाव चौकात घडली.
शनिवारी सकाळी देगलूर आगाराची बस (क्रमांक एम एच १४ बीटी १५६७) नांदेड येथून देगलूरकडे निघाली. दरम्यान, धनेगाव बायपास मार्गे नांदेड शहरात येणाऱ्या (एमएच-४२ बी-९७७५) या ट्रकने धनेगाव चौकात सदर बसच्या डाव्या बाजूने जोराची धडक दिली.
यात बस उलटून जवळपास १५ प्रवासी आणि चालक, वाहक जखमी झाले आहेत. या अपघातात मोहमद आजम मोहमद खान कासिम, हनुमंत पडलवार, संभाजी शिंदे-गोळेगाव ता. लोहा, भाऊराव डोबाडे-धनेगाव, गणेश इबितवार-बिलोली, शंकर फुलारी-करडखेड ता. देगलूर, माधव देवकत्ते-चौफाळा ता. मुखेड, सदाशिव पाटील, पांडुरंग भोंग-काजाळा ता. लोहा, शेख बशीरलाल अहेमद- घुंगराळा ता. नायगाव, गंगाधर देशमुख-गोळेगाव ता. लोहा यांच्यावर शासकीय रुग्णालयात तर सीताबाई मंडळे-गोकुळनगर, नांदेड, यमुनाबाई वाडेकर-गोकुळनगर, नांदेड यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. शासकीय रूग्णालयातील काही रूग्णांवर उपचार करून सुटी देण्यात आली़ दरम्यान, बसमधील इतर प्रवासी सुखरूप आहेत.
अपघात झाल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत सर्व प्रवाशांना बसबाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, एस.टी.चे विभागीय वाहतूक अधिकारी अविनाश कचरे, आगार व्यवस्थापक व्यवहारे, कांबळे आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली तसेच तातडीने रुग्णालयात जाऊन जखमींची आणि नातेवाईकांची विचारपूस केली. त्याचबरोबर जखमींना तात्काळ मदत म्हणून प्रत्येकी पाचशे ते हजार रूपये रोख देण्यात आले़