जि.प.चे ओबीसी कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:09 IST2021-02-11T04:09:28+5:302021-02-11T04:09:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागांतर्गत (जीएडी) सद्य:स्थितीत पदोन्नतीची प्रक्रिया राबविली जात आहे; ...

ZP's OBC staff deprived of promotion | जि.प.चे ओबीसी कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित

जि.प.चे ओबीसी कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागांतर्गत (जीएडी) सद्य:स्थितीत पदोन्नतीची प्रक्रिया राबविली जात आहे; परंतु या प्रक्रियेपासून ओबीसी प्रवर्गातून निवडीने नेमणूक दिलेल्या मर्यादित स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण कर्मचाऱ्यांना डावलल्या जात असल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. एकप्रकारे ओबीसी कर्मचाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविण्यात आल्याची चर्चा जि. प. वर्तुळात सुरू आहे. जि. प. च्या सर्वसाधारण सभेतही हा मुद्दा गाजला होता. सदस्या अवंतिका लेकुरवाळे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. हे विशेष.

जि.प.अंतर्गत कनिष्ठ सहायक कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित स्पर्धा परीक्षा विभागीय आयुक्तालयाद्वारे घेण्यात येते. ही परीक्षा उत्तीर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ सहायक पदावर निवडीने नेमणूक देण्याची तरतूद महाराष्ट्र जि.प. जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम १९६७ अन्वये करण्यात आली असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच ग्राम विकास विभागाचे पत्र क्र. एपीटी १०९२/१०२६ सीआर ६०२/१३ २१ सप्टेंबर १९९२ अन्वये निवडीने भरण्यासाठी मागासवर्गीयांच्या प्रत्येक गटातील व्यक्तीसाठी राखून ठेवण्याचे आरक्षणाचे प्रमाण सेवाप्रवेश नियमामध्ये नामनिर्देशनासाठी विहित केलेल्या आरक्षणाच्या प्रमाणानुसार ठरविण्यात यावे व त्यासाठी स्वतंत्र १०० बिंदू नामावली ठेवण्यात यावी, असे निर्देश आहेत. याच नियमांतर्गत आजतागायत कार्यवाही होऊन स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण कर्मचाऱ्यांना नागपूर जि.प.ने त्यांचे स्वत: चे आदेशान्वये वरिष्ठ सहायक पदावर निवडीने नेमणूक दिलेली आहे.. मात्र, या नियमाची व स्वत:च्याच नेमणूक आदेशाचे विस्मरण जि.प.च्या जीएडीला झाले असून, निवडीने नेमणूक दिलेल्या कर्मचाऱ्यांची नेमणूक ही पदोन्नती आहे, किंवा नामनिर्देशनाव्दारे नेमणूक आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या कारणावरून अनेक परीक्षा उत्तीर्ण मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यातही ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये कोणतेही आरक्षण नसताना अशा ओबीसी प्रवर्गातून परीक्षा उत्तीर्ण करून निवड झालेल्या कर्मचाऱ्यांनादेखील जि.प.ने पदोन्नतीपासून दूर ठेवल्याचा आरोप होत आहे.

Web Title: ZP's OBC staff deprived of promotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.