डेंग्यू, चिकुनगुनिया निगेटिव्ह आलेल्यांची होणार झिका तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2021 07:31 PM2021-08-06T19:31:43+5:302021-08-06T19:32:13+5:30

Nagpur News ज्या रुग्णाची डेंग्यू व चिकुनगुनियाची चाचणी निगेटिव्ह येऊन ताप असल्यास अशा रुग्णाची झिका तपासणी केली जाणार आहे. राज्यात शासकीय केंद्र असलेल्या सहा ठिकाणी ही तपासणी होणार आहे.

Zika will be tested for dengue and chikungunya negative people | डेंग्यू, चिकुनगुनिया निगेटिव्ह आलेल्यांची होणार झिका तपासणी

डेंग्यू, चिकुनगुनिया निगेटिव्ह आलेल्यांची होणार झिका तपासणी

googlenewsNext
ठळक मुद्देखासगी लॅबमध्ये ५ संशयित रुग्णांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : झिका आजाराचा एक रुग्ण पुण्यात आढळून आल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. यामुळे नियमित आजारासह झिका चाचणी करण्यावर भर दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, ज्या रुग्णाची डेंग्यू व चिकुनगुनियाची चाचणी निगेटिव्ह येऊन ताप असल्यास अशा रुग्णाची झिका तपासणी केली जाणार आहे. राज्यात शासकीय केंद्र असलेल्या सहा ठिकाणी ही तपासणी होणार आहे. यात नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेयो) प्रयोगशाळेचा समावेश आहे.

कोरोनाचे संकट कमी होत नाही तोच झिका विषाणूचे संकट निर्माण झाले आहे. गर्भवती महिला व गर्भातील बाळांना या विषाणूचा अधिक धोका असल्याने खबरदारीच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. हा विषाणू एडिस जातीच्या डासांपासून पसरतो. याच डासापासून डेंग्यू व चिकुनगुनियादेखील होतो. म्हणूनच झिकाचा संसर्ग तपासण्यासाठी चिकुनगुनिया व डेंग्यूची टेस्ट निगेटिव्ह असूनही ताप असलेल्यांची झिका तपासणी केली जाणार आहे. याकडे आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे. झिकाची तपासणी करण्यासाठी ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्यात येते. सध्या झिकाची चाचणी खासगी तत्त्वावर करण्यासाठी नागपुरातील रामदासपेठ येथील एका लॅबने ‘रिएजंट’ विकत घेतले आहे. आतापर्यंत पाच संशयित रुग्णाची तपासणी केली. पाचही नमुने निगेटिव्ह आल्याची माहिती आहे.

-राज्यात सहा ठिकाणी चाचणी

राज्यात झिकाच्या चाचणीसाठी शासकीय प्रयोगशाळा असलेल्या ‘एनआयव्ही’ पुणे, कस्तुरबा हॉस्पिटल, मुंबई, हाफकीन इन्स्टिट्यूट, मुंबई, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर यासह आणखी दोन प्रयोगशाळेचा समावेश आहे. मेयोमध्ये अद्ययावत असे ‘आरटीपीसीआर’ यंत्र असून अनुभवी मनुष्यबळ आहे. तूर्तास तरी त्यांना याबाबतची मंजुरी मिळालेली नाही; परंतु चाचणीचा यादीत या प्रयोगशाळेचे नाव आले आहे.

-रिएजंट उपलब्ध झाल्यास तपासणीला सुरुवात

झिका विषाणूच्या तपासणीचा यादीत मेयो प्रयोगशाळेचे नाव आहे. मंजुरी मिळाल्यास व पुण्याच्या ‘एनआयव्ही’कडून रिएजंट मिळाल्यास तपासणीला सुरुवात केली जाईल. डेंग्यू व चिकुनगुनिया चाचणी केल्यावरही निगेटिव्ह आलेल्या व ताप असलेल्या रुग्णांची चाचणी केली जाईल.

-डॉ. रवींद्र खडसे, मायक्रोबायोलॉजी विभाग, मेयो

Web Title: Zika will be tested for dengue and chikungunya negative people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.