नागपुरातील युवकांनी दंडकारण्यात घुसून नक्षल्यांचे स्मारक केले उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:13 IST2021-08-17T04:13:14+5:302021-08-17T04:13:14+5:30

- स्वातंत्र्यदिनी युवकांचे धाडस : घटनेचे व्हिडिओ झाले सोशल मीडियावर व्हायरल लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एकीकडे सबंध देशात ...

Youths from Nagpur infiltrated Dandkaran and demolished Naxal monuments | नागपुरातील युवकांनी दंडकारण्यात घुसून नक्षल्यांचे स्मारक केले उद्ध्वस्त

नागपुरातील युवकांनी दंडकारण्यात घुसून नक्षल्यांचे स्मारक केले उद्ध्वस्त

- स्वातंत्र्यदिनी युवकांचे धाडस : घटनेचे व्हिडिओ झाले सोशल मीडियावर व्हायरल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एकीकडे सबंध देशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव जल्लोषात साजरा केला जात असताना, दुसरीकडे नागपुरातील युवकांनी दंडकारण्यात घुसून नक्षलवाद्यांचे स्मारक उद्ध्वस्त करत नागरिकांमधील नक्षलवाद्यांची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला.

नागपुरातील जनसंघर्ष समिती ही गेल्या काही वर्षांपासून दंडकारण्य अर्थात गडचिरोलीतील नक्षली प्रभाव असलेल्या दुर्गम भागात जाऊन सेवाकार्य करत आहे. तेथील नागरिकांना स्वातंत्र्याचा अर्थ समजावून सांगताना आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्था पोहोचविण्याचे कार्य करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या भागातील आदिम जनजातींमध्ये असलेले नक्षली कारवायांचे भय दूर करण्यासाठी क्रांतिकारी पावलेही समितीमार्फत उचलली जात आहेत. त्याच श्रुंखलेत भामरागडपासून २२ किमी अंतरावर असलेल्या आरेवाडा या गावालगत रस्त्याच्या कडेला नक्षल्यांनी उभे केलेले स्मारक या कार्यकर्त्यांनी जाळून उद्ध्वस्त केले. त्यानंतर ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या. या कृतीचे व्हिडिओही देशभरात प्रसारित झाले आहेत. विशेष म्हणजे, कार्यकर्त्यांनी केलेल्या या कार्याची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचण्यास उशीर झाल्याने मोठीच तारांबळ उडाली आहे.

दरम्यान, सोमवारी नागरिकांना रस्त्याच्या कडेला स्मारक जाळल्याचे दिसले. हे कुणी जाळले याबद्दल दुपारपर्यंत पोलीस व नागरिकांमध्ये संभ्रम होता. नंतर नागपुरातील जनसंघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनीच हे स्मारक जाळल्याचे स्पष्ट झाले.

स्मारक जाळल्याची घटना खरी

या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी लोकमतने भामरागडचे उपविभागीय अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्याकडे विचारणा केली असता, स्मारक जाळल्याची घटना खरी असल्याचे त्यांनी सांगितले. एका सामाजिक संघटनेकडून हे स्मारक जाळले गेले असले तरी त्यांनी पोलिसांकडून यासाठी मदत मागीतली नव्हती. तसेच या घटनेची पोलिसात नोंद नसल्याचे त्यांनी सांगितले.

मुरंगलमध्ये पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिन सोहळा

भामरागडपासून २२ किमी अंतरावर असलेल्या मुरंगलमध्ये पोलिसांच्या पुढाकाराने जनसंघर्ष समितीच्या वतीने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य मिळाल्याच्या ७४ वर्षात प्रथमच या गावाने स्वातंत्र्यदिनाचा सोहळा पाहिला, हे विशेष. यावेळी समितीकडून मुलांना शालेय साहित्य व नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही केले.

...................

Web Title: Youths from Nagpur infiltrated Dandkaran and demolished Naxal monuments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.