आपलीच शाळा आहे सेंटर, मग कशाची भीती?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:05 IST2021-03-29T04:05:17+5:302021-03-29T04:05:17+5:30
नागपूर : कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र अक्षरश: बुडाल्यासारखेच झाले. शाळा सुरू झाल्या नाहीत, अभ्यास पूर्ण झाला नाही. लिखाणाचा सराव ...

आपलीच शाळा आहे सेंटर, मग कशाची भीती?
नागपूर : कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र अक्षरश: बुडाल्यासारखेच झाले. शाळा सुरू झाल्या नाहीत, अभ्यास पूर्ण झाला नाही. लिखाणाचा सराव सुटला, बैठकीची सवय सुटली. हो नाही करता करता परीक्षाही तोंडावर आल्या. अडचणींच्या सावटात परीक्षा कशा देणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे होता; परंतु शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काहीसा दिलासा दिला. ज्या शाळेत विद्यार्थी प्रवेशित आहे, तीच शाळा विद्यार्थ्यांना परीक्षेचे केंद्र मिळणार आहे. त्यामुळे ज्यांचे वर्षभर वर्ग झाले नाहीत. ज्यांनी अभ्यासाची पुस्तकेही उघडली नाहीत, अशा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी समाधानाची उसंत घेतली आहे.
कोरोनाने विद्यार्थ्यांना परीक्षा न देता नववीतून दहावीत व अकरावीतून बारावीत ढकलेले. अख्खे सत्र विना शिक्षणाचे आटोपले आणि आता तोंडावर परीक्षा आल्यात. शासनाने यंदा अभ्यासक्रमात २५ टक्के कपात केली; पण ७५ टक्केही अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नाही. अभ्यासक्रम पूर्ण न झाल्याने विद्यार्थी चिंतेत होते. ऑनलाइनचे शिक्षण अनेक विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून गेले. ग्रामीण भागात ऑनलाइनचा पर्याय अपयशी ठरला. त्यामुळे अनेकांनी पुस्तकेही उघडली नाही. परीक्षेची तयारी न झाल्यामुळे वर्ष वाया जाईल, अशी भीती विद्यार्थ्यांना होती. शाळेचा निकाल यंदा घरसेल अशी चिंता शिक्षकांना होती; पण बोर्डाकडून यंदा विद्यार्थ्यांना काही बाबतीत शिथिलता मिळाली. स्वत:ची शाळा सेंटर देऊन बोर्डाने अनेक विद्यार्थ्यांची चिंताच मिटविली. या निर्णयाबद्दल शिक्षकांनीही अनेक मतमतांतरे व्यक्त केली आहेत. परीक्षेची गंभीरता राहणार नाही; पण सुरक्षेची हमी राहील, अशीही भावना शिक्षकांची आहे.
- ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होईल. या परीक्षेत असेही होईल की मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्याला कमी व पुस्तकाला हातही न लावलेल्या विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळतील.
-बाळा आगलावे, शिक्षक
- बोर्डाने कोरोनाचे संक्रमण लक्षात घेता, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही प्रशासकीय व्यवस्था निर्माण केली आहे; पण विद्यार्थी पूर्णपणे परीक्षेसाठी तयार झालेला नाही. यावर्षी विद्यार्थ्याला पास व्हायला अडचणीचे नाही; पण क्वॉलिटी मिळणार नाही. तसे तर आपली शाळा आपले सेंटर कसे हाताळावे, याची जबाबदारी मुख्याध्यापकांची आहे.
-दीपक नागपुरे, शिक्षक
- माझी शाळा माझे सेंटर असल्याची विद्यार्थ्यांची भावना बरोबर नाही. ही बोर्डाची परीक्षा आहे. बोर्डाचे नियंत्रण राहणार आहे. परीक्षेचे गांभीर्य परीक्षकांना ठेवावेच लागेल. विद्यार्थ्यांना जेवढे सोपे वाटते तेवढे सहज शक्य नाही.
-संदीप उरकुडे, शिक्षक
- बोर्डाने सुरक्षेच्या दृष्टीने ही सोय केली आहे. काही सेंटरमध्ये त्याचा गैरफायदाही घेतल्या जाईल; पण पुढच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठीच ही बाब चुकीची राहील.
-मिलिंद वानखेडे, शिक्षक
- पालकांची धास्ती घालविण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही उपाययोजना आहे. याचा दुरुपयोग होऊ नये. परीक्षा परीक्षेसारखी व्हायला हवी. विद्यार्थ्यांनी अभ्यास करूनच परीक्षा द्यावी.
-प्रदीप बिबटे, शिक्षक