लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : असं म्हणतात, प्रेम, एक अशी भावना जी व्यक्त होताच चेहरा खुलतो, बहर येतो. तसं बघितलं तर प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी कुठल्याही ठरावीक वेळेची, जागेची, गरज नसते. ३६५ दिवस हे प्रेमाचेच असतात, पण व्हॅलेंटाइन डे की बात ही कुछ और है! या ’डे’मधील खरा गोडवा ’चॉकलेट डे’चाच. म्हणजेच चॉकलेट द्या. त्यातून प्रेमळ भावना व्यक्त करा. चॉकलेट डे केवळ शोभेचा किंवा मिरविण्याचा नसावा तर तुमच्या वृत्तीत, भावनेत आणि नात्यातही या दिवसाचा गोडवा कायम असावा, अशी अपेक्षा आहे.
चॉकलेट म्हणजे हा नैसर्गिक पदार्थ नाही तर तो विशिष्ट बियांच्या कल्पातून आविष्कृत केलेला चविष्ट असा हा पदार्थ आहे. याला हजारो वर्षांची परंपरा असून, पश्चिमेतच याचा आविष्कार घडला असे मानले जाते. पश्चिमेकडूनच आलेला व्हॅलेंटाईन डे हा प्रेम व्यक्त करण्याचा विशेष दिवस म्हणून हळूहळू भारतातही प्रचार पावला आहे. तरुणांमध्ये हा दिवस विशेषत्वाने लोकप्रिय झाला आहे. फेब्रुवारी महिना लागला की प्रत्येकच जण या दिवसाची वाट बघत असतो. त्या दिवसाची प्रतीक्षा सुकर व्हावी म्हणून सप्ताह साजरा करण्याची परंपरा प्रचलित झाली आणि दिवसाच्या सात दिवसांपूर्वीपासून एक एक दिवसाला विशेष अशी बिरुदे लावली गेली. त्याच श्रुंखलेत ‘चॉकलेट डे’. चॉकलेट म्हटले की ते कुणाला आवडत नाही, असे शक्यच नाही. अगदी मधुमेह झालेला व्यक्तीही मांजर जसे डोळे मिटून दूध पिते, तसेच तो चॉकलेटचा आस्वाद घेण्यास मागेपुढे पाहत नाही. गुलाबाचे फूल देऊन ओळख झाली, एकमेकांच्या नात्याला ओळख देण्यासाठी प्रपोज झाला आणि नात्यांची गुंफण घट्ट व्हावी म्हणून चॉकलेटचे आमिष, असा हा या सप्ताहातील दंडोक आहे. सध्या कोरोनाने दुखावलेल्या काळात ‘चॉकलेट डे’ अतिशय महत्त्वाचा ठरतो आहे. या दिवसाच्या निमित्ताने नागरिकांनी एकमेकांच्या सुख-दु:खाच्या क्षणात कायम गोडवा पेरत राहावा, हीच अपेक्षा आहे.
......