तरुणाने झाडली स्वत:वर गोळी : नागपूरच्या अजनीत घडला थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 21:54 IST2019-08-23T21:53:21+5:302019-08-23T21:54:58+5:30
कर्जबाजारी तरुणाने कर्जदाराच्या तगाद्यातून सुटका करून घेण्यासाठी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. अजनीतील जयवंत नगरात घडलेली ही थरारक घटना गुरुवारी रात्री १० च्या सुमारास उघडकीस आली.

तरुणाने झाडली स्वत:वर गोळी : नागपूरच्या अजनीत घडला थरार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कर्जबाजारी तरुणाने कर्जदाराच्या तगाद्यातून सुटका करून घेण्यासाठी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. अजनीतील जयवंत नगरात घडलेली ही थरारक घटना गुरुवारी रात्री १० च्या सुमारास उघडकीस आली. आशिष धर्मदास उसरे (वय २६) असे मृताचे नाव आहे.
आशिष मूळचा कामठी येथील रहिवासी आहे. तो तेथे टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स कंपनीत काम करायचा. वर्षभरापूर्वी त्याने बीसी चालवणे सुरू केले. त्याच्या बीसीत अनेक सदस्य होते. त्यामुळे महिन्याला मोठी रक्कम जमा व्हायची. त्यातील काही कमिशन आशिषला मिळत होते. आठ महिन्यांपूर्वीच आशिषचे लग्न झाले. दरम्यान, त्याने बीसीचे पैसे कुठे खर्च केले कळायला मार्ग नाही. बीसी बंद पडल्याने पैसे भरणारांनी आशिषमागे पैशासाठी तगादा लावला. कामठीत फसवणुकीची तक्रारही नोंदवली. कर्जदाराच्या तगाद्यामुळे दोन महिन्यांपूर्वी आशिष त्याची पत्नी योगिनीला घेऊन नागपुरात राहायला आला. अजनीच्या जयवंतीनगरात तो भाड्याने राहू लागला. दरम्यान, योगिनेचे नातेवाईक मरण पावल्यामुळे ती गुरुवारी सकाळी अंत्यसंस्काराला निघून गेली. त्यानंतर तिने दिवसभरात अनेकदा आशिषच्या मोबाईलवर संपर्क केला. मात्र, त्याच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे ती रात्री १० च्या सुमारास घरी पोहचली. आतून दार बंद असल्यामुळे तिने बराच वेळ दार ठोठावले. प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून योगिनीने आपल्या घर मालकांना आवाज दिला. त्यांनी बाजूच्या खिडकीच्या फटीतून बघितले असता आशिष रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसला. त्यांनी आरडाओरड केल्यामुळे शेजारी गोळा झाले. माहिती कळाल्याने अजनीचे सहायक पोलीस निरीक्षक भास्कर आपल्या सहकाऱ्यांसह पोहचले. त्यांनी दार तोडून आत प्रवेश केला तेव्हा आशिष रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. त्याच्या बाजूलाच पिस्तूलही पडून होती. पोलिसांनी आशिषने सुसाईड नोट लिहून ठेवली का, ते तपासण्यासाठी आजूबाजूला पाहणी केली. मात्र काही मिळाले नाही. त्याने कर्जबाजारीपणाला कंटाळूनच आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. योगिनी आशिष उसरे (वय २२) हिने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
पिस्तुल कुठून मिळवले ?
पिस्तुलातील एक गोळी आशिषने स्वत:वर झाडून घेतली आणखी दोन काडतूस पिस्तुलात फसून होते. आशिषने आत्महत्येसाठी पिस्तुल कुठून मिळवले, ते कळायला मार्ग नाही. दोन-तीन दिवसांपूर्वी योगिनीला पिस्तुल दिसल्याने तिने आशिषला त्याबाबत विचारणा केली होती. ते पिस्तुल नकली (खेळण्याचे) आहे, असे आशिषने तिला सांगितले होते. त्यामुळे तिने त्याकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले नव्हते.