नागपुरात इमारतीवरून उडी मारून तरुणीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 20:29 IST2020-03-03T20:28:27+5:302020-03-03T20:29:20+5:30
खासगी कंपनीत सेल्स एक्झिकेटीव्ह म्हणून कार्यरत असलेल्या एका तरुणीने बहुमजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.

नागपुरात इमारतीवरून उडी मारून तरुणीची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खासगी कंपनीत सेल्स एक्झिकेटीव्ह म्हणून कार्यरत असलेल्या एका तरुणीने बहुमजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अॅलेक्सीस हॉस्पिटलच्या मागच्या भागात मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. अंकिता कृष्णराव माकोडे (वय २४) असे मृत तरुणीचे नाव आहे. पाचपावलीच्या जामदार वाडीत अंकिता राहत होती.
या कंपनीचे कार्यालय राज पॅलेस या बहुमजली इमारतीत आहे. नेहमीप्रमाणे ती आज कामावर आली. काही वेळपर्यंत ती मोबाईलवर बोलण्याचा प्रयत्न करीत होती. दुपारी ३ च्या सुमारास ती चौथ्या माळ्यावर गेली आणि तेथून तिने खाली उडी मारली. डोक्याला जबर दुखापत झाल्याने अंकिताचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, इमारतीवरून तरुणीने उडी मारल्याचे पाहून आजूबाजूच्यांनी एकच गर्दी केली. माहिती कळताच मानकापूरचे ठाणेदार वजिर शेख त्यांच्या सहकाऱ्यांसह तिकडे धावले. तोपर्यंत अंकितासोबत काम करणारे कार्यालयीन सहकारीही तेथे पोहचले. त्यांनी अंकिताची ओळख पटविल्यानंतर तिच्या पालकांशी संपर्क करून घटनेची माहिती देण्यात आली. दरम्यान, गर्दी वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी अंकिताचा मृतदेह रुग्णालयात पाठविला. पोलीस अंकिताच्या आत्महत्येमागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.