ठळक मुद्दे‘सारंग’ चमूच्या ‘हेलिकॉप्टर्स’ने फेडले पारणे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वातावरणात एकच जल्लोष..प्रत्येकाची नजर आकाशाकडे...ते कधी येणार, कधी दिसणार याची उत्सुकता...अचानक एका टोकाला ठिपका दिसू लागला..अवघ्या काही क्षणातच वायुचा वेग अन् आसमंताला कवेत घेणारा आवाज दणाणला...अन् देशाच्या वायुसेनेचे बलस्थान असणाऱ्या ‘सुखोई’ची अवकाशातील कोलांटी पाहून सर्वांच्याच तोंडून निघाले ‘हॅट्स ऑफ टू इंडियन एअर फोर्स’. शुक्रवारचा अनुभव नागपूरकरांना रोमांच, थरार आणि राष्ट्रशक्तीचा अ़नोखा अनुभव देणारा ठरला. मेंटेनन्स कमांड मुख्यालयाच्या ६५व्या आणि भारतीय वायुसेनेच्या ८७व्या स्थापनादिनानिमित्त ‘मेंटेनन्स कमांड’तर्फे १० नोव्हेंबर रोजी ‘एअर शो’चे आयोजन करण्यात आले आहे. याच्या ‘फुल ड्रेस रिहर्सल्स’चे साक्षीदार होण्याची संधी नागपूरकरांना मिळाली व भारतीय वायुसेनेची शक्ती व कौशल्याचे ‘याची देही याची डोळी’ साक्षीदार होता आले.
शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास वायुसेनानगरच्या परेड मैदानावर मुख्य सोहळ्याची रंगीत तालीम झाली. यावेळी निवडक शाळांमधील विद्यार्थी, ‘एअरविंग’चे कॅडेट्स सहभागी झाले होते. सर्वात अगोदर ‘एमआय-७५’ हेलिकॉप्टर अवकाशात दिसले व त्यानंतर काहीच वेळात ‘अ‍ॅव्ह्रो’ विमान ‘पास’ झाले. काहीच वेळात आलेल्या ‘सुखोई-सु-३०’ ला पाहून तर सर्वांनी अक्षरश: ‘आ’च वासला. पुढील दोन तास एकाहून एक सरस हवाई कवायतींचे सादरीकरण झाले व उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले गेले.

‘सूर्यकिरण’ला हवामानाचा फटका 


हवाई शोमध्ये ‘सूर्यकिरण’ विमानांच्या सादरीकरणाकडे सर्वांचे लक्ष होते. निर्धारित वेळेत नऊ विमानांची चमू ‘एअरस्पेस’मध्ये पोहोचली. नारंगी व पांढऱ्या रंगाची ही ‘हॉल एचजेटी-१६’ विमाने एका रांगेत होती. मात्र या विमानांच्या ‘एअरोबॅटीक’ कसरती होऊ शकल्या नाही. नागपुरातील वातावरणात धुके असल्याने ‘व्हिजिबिलीटी’ नव्हती. त्यामुळे कवायती सादर करणे धोक्याचे ठरले असते. त्यामुळे विमाने ‘बेस’कडे परतली.

‘आकाशगंगा’ चमूने जिंकली मने 

‘आकाशगंगा’ ही स्काय डायव्हिंग करणारी भारतीय वायुसेनेची चमू आहे. यामध्ये चौदा सदस्यांचा समावेश आहे. कुणाच्याही ध्यानीमनी नसताना सर्वांच्या डोक्याच्या वर ‘पॅरेशूट्स’चे ठिपके दिसायला लागले व त्यानंतर एकानंतर एक सर्व ‘पॅराट्रूपर्स’ अलगदपणे जमिनीवर आले. तीनच्या जोडीने आलेल्या चमूने तर अवकाशात तिरंगा सादर केला व अवघ्या काही फुटांवर ते एकमेकांपासून वेगळे झाले. सर्वांनी या धाडसी कौशल्याची वाहवा केली.

‘सारंग’ चमूत नागपूरकर वैमानिक 

भारतीय हवाई दलाच्या हवाई कसरती करणाऱ्या सारंग हेलिकॉप्टर पथकाने तर ‘एअर शो’मध्ये आणखी थरार आणला. ‘सारंग’च्या दोन चमूमध्ये प्रत्येकी चार ‘ध्रुव’ हेलिकॉप्टर्सचा यात समावेश होता. विशिष्ट प्रकारे डिझाइन केलेल्या पंख्यांमुळे ध्रुव हेलिकॉप्टरमधून विविध प्रकारच्या कसरती करणे शक्य होते तसेच लष्करी वापरासाठी ते अत्यंत उपयुक्त ठरते. एकमेकांच्या समोर येत ‘क्रॉस’ करणे, अलगदपणे हेलिकॉप्टरची दिशा बदलत त्याला लंबरेषेत वर घेऊन जाणे, हवेत ‘हार्ट शेप फॉर्मेशन’ करणे इत्यादी कसरती या चमूने केल्या. सुमारे २० मिनीट या कसरती सुरू होत्या. विशेष म्हणजे या चमूमध्ये ग्रुप कॅप्टन सचिन गद्रे व स्क्वॉर्डन लीडर स्नेहा कुळकर्णी व हे नागपूरकर वैमानिकांचा समावेश होता.

‘गरुड’च्या जवानांची अचूकता 

प्रत्यक्ष रणभूमीवर हवेतून जवान जमिनीवर कशा पद्धतीने उतरतात याचेदेखील चित्तथरारक सादरीकरण झाले. ‘एमआय-१७’ हेलिकॉप्टर’मधून विशेष प्रशिक्षित जवानांचा समावेश असलेली ‘गरुड’ची चमू उतरली. डोळ्याचे पाते लवते न लवते तो हे जवान दोरीच्या माध्यमातून हेलिकॉप्टरमधून खाली उतरले व त्यानंतर आपल्या रायफल्ससह ‘दक्ष’ पवित्रा घेतला.

‘एअरोमॉडेलिंग’मध्येदेखील ‘सुखोई’
‘नंबर २ महाराष्ट्र एअर स्क्वॉर्डन एनसीसी नागपूर’तर्फे ‘एअरोमॉडेलिंग’चे सादरीकरण करण्यात आले. राजेश जोशी यांच्या नेतृत्वात झालेल्या या सादरीकरणात लहान विमाने रिमोटच्या सहाय्याने उडविण्यात आली व त्याच्यादेखील कवायती सादर करण्यात आल्या. यातदेखील ‘सुखोई’ची प्रतिकृती असलेल्या विमानांनी अवकाशात कसे युद्ध होते याचे प्रात्यक्षिक दाखविले. सहाव्या वर्गातील श्रेयस पिंपळापुरे, नववीतील अथर्व चव्हाण यांच्यासह महेश्वर ढोणे, सचिन पिंपळापुरे, कॅ.अभिलाश दखने, कॅ.पुर्वेश दुरगकर, कॅ.अकिन घोडेस्वार, कॅ.वैभव घोडेस्वार, कॅ.सुमांशू क्षिरसागर यांचा यात समावेश होता.

‘बॅन्ड’ व ‘ड्रील’ने आणली रंगत
दरम्यान, एअर फोर्स बॅन्डनेदेखील विविध ‘थीम सॉन्ग’ सादर केले. ज्यु.वॉरंट ऑफिसर मनोरंजन ठाकूर यांच्या नेतृत्वात हे सादरीकरण झाले. तर दुसरीकडे रायफलधारी जवानांच्या ‘ड्रील’ने ‘एअर शो’मध्ये रंगत आणली. कदमताल करता करता क्षणात जवान एकमेकांच्या ‘रायफली’ बदलत होते.

Web Title: Yes ... Sky is the limit! Nagpurkar experienced the thrill of Sukhoi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.