This year's Navratra-Diwali will be celebrated by Gomay Pantan | यंदाची नवरात्र-दिवाळी उजळणार गोमय पणत्यांनी

यंदाची नवरात्र-दिवाळी उजळणार गोमय पणत्यांनी

ठळक मुद्देआत्मनिर्भर महिला : गांधी जयंतीला होणार एक लाख दिव्यांची सजावटउमरेड तालुक्यातील महिलांची झेप

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतात बहुतांश व्यवसाय आत्मनिर्भरतेच्या कसोटीस खरे उतरतात. मात्र, स्पर्धेच्या उचापतीत ती जाणीव नव्हती. हीच बाब हेरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, कोरोनाच्या काळात ठप्प झालेल्या आर्थिक उलाढालीला वेग देण्यासाठी आत्मनिर्भरतेचा नारा दिला. या नाऱ्याला लीलया उचलून धरत उमरेड तालुक्यातील महिला स्वयंभू होण्याच्या दिशेने अग्रेसर झाल्या आहेत. कोरोना संक्रमणात पसरलेल्या अंधारात चाचपडणाऱ्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी या महिला पणत्यांचा आधार देणार आहेत. यंदाची नवरात्र-दिवाळी त्यांनीच केलेल्या पणत्यांनी उजळणार आहे.


नागपुरात कार्यरत असलेली स्वयंसेवी संस्था निसर्ग विज्ञान मंडळाच्या मार्गदर्शनात उमरेड तालुक्यातील कष्टकरी महिलांना स्वयंभू करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मंडळाच्या मार्फत गोमय वस्तूंच्या निर्मितीवर बऱ्याच काळापासून संशोधन सुरू आहे आणि त्या संशोधनातून निर्मित वस्तूंना उद्योगाचा दर्जा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच अनुषंगाने ‘गोमय समृद्धी’चा नारा बुलंद करण्यात येत आहे. गाय आणि शेतीवर निर्भर उद्योगांना चालना देण्यात येत आहे. त्यातच आत्मनिर्भरतेच्या घोषणांनी या प्रयत्नांना बळ दिले. दरम्यान गणपतीच्या मूर्तीही शेण, माती, गोमूत्र आदी पंचगव्याच्या माध्यमातून बनविण्यात आल्या. आता पुढे नवरात्र आणि दिवाळी येत आहे. या काळात घरोघरी दिव्यांची गरज भासणार आहे. त्यातच वर्धा येथील महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालयाने यंदा गांधी जयंतीला एक लाख पणत्या उजळण्याचा प्रण केला आहे. हा संयोग जोडत या महिला हे दिवे तयार करत आहेत. २ आॅक्टोबरला गांधी जयंतीला सेवाग्राम येथील गांधी पुतळा ते बापू कुटी दरम्यान एक लाख पणत्या प्रज्वलित केल्या जाणार आहेत आणि या पणत्या उमरेडच्या महिला साकारत आहेत. २५ महिलांची ही फौज मिळेल त्या वेळेत हे दिवे साकारत आहेत. त्यातच पुढे नवरात्र आणि दिवाळीही असणार आहे. त्यामुळे, इवल्याशा पणत्या ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला प्रखर करणार आहेत.

ऋतुगंध गटातील महिला करत आहेत काम - विजय घुगे
मधल्या काळात महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या हेतूने उमरेड तालुक्यातील काही गावातील महिलांसाठी कार्यशाळा घेण्यात आली होती. त्यातून २५ महिलांचा ऋतुगंध हा गट तयार करण्यात आला. या महिला पूर्णवेळ पणत्या तयार करण्याच्या कामात गुंतल्या आहेत. कौशल्याला व्यावसायिक जोड देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यातून अनेकांना रोजगार प्राप्त होणार असल्याचे निसर्ग विज्ञान मंडळाचे विजय घुगे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या प्रकल्पाला ग्रामायण प्रतिष्ठानचे अनिल सांबरे, नेत्रवनचे समन्वयक दीपक शाहू यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचेही ते म्हणाले.

Web Title: This year's Navratra-Diwali will be celebrated by Gomay Pantan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.