यवतमाळ जिल्हा काँग्रेस अध्यक्षांचा राजीनामा
By Admin | Updated: June 27, 2014 00:37 IST2014-06-27T00:37:01+5:302014-06-27T00:37:01+5:30
लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस उमेदवाराच्या पराभवानंतर कार्यकर्त्यांमधून दबाव वाढल्याने अखेर यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार वामनराव कासावार यांनी पदाचा राजीनामा दिला.

यवतमाळ जिल्हा काँग्रेस अध्यक्षांचा राजीनामा
विधानसभा निवडणूक न लढण्याची घोषणा
यवतमाळ : लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस उमेदवाराच्या पराभवानंतर कार्यकर्त्यांमधून दबाव वाढल्याने अखेर यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार वामनराव कासावार यांनी पदाचा राजीनामा दिला. एवढेच नव्हे तर यापुढे मी किंवा माझा मुलगा विधानसभा निवडणूक लढणार नाही, अशी घोषणाही त्यांनी पत्रपरिषदेत केली.
लोकसभा निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यातून सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे (यवतमाळ-वाशीम) आणि सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे (चंद्रपूर) यांचा पराभव झाला. निकालाच्या तब्बल महिनाभरानंतर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक झाली. त्यात कार्यकर्त्यांची आक्रमकता पाहून जिल्हा कार्यकारिणीच बरखास्त करण्यात आली. परंतु लोकसभेतील पराभवाला केवळ कार्यकर्तेच जबाबदार कसे, असा प्रश्न उपस्थित करीत कासावार यांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची मागणी पुढे आली. बुधवारी येथे काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी बैठक घेऊन पत्रपरिषदेत कासावारांच्या राजीनाम्याची मागणी केली. सगळीकडून दबाव वाढत असल्याचे पाहून अखेर वामनराव कासावार यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आपला राजीनामा सोनिया गांधींकडे पाठविल्याचे त्यांनी पत्रपरिषदेत सांगितले. शिवाय मी किंवा माझा मुलगा या पुढे विधानसभा निवडणूक लढणार नाही, परंतु पक्षाने कोणताही आदेश दिल्यास तो आपल्याला मान्य राहील, अशी भूमिका कासावारांनी जाहीर केली. आपल्या कार्यकाळात काँग्रेसमधील गटबाजी संपुष्टात आली, पदाधिकाऱ्यांमध्ये सुसंवाद होता, असा दावाही त्यांनी केला. पूर्वी जिल्ह्यात तीनही लोकसभा मतदारसंघ विरोधकांकडे होते. परंतु यावेळी हिंगोलीची जागा काँग्रेसने पटकाविली. आपल्या कार्यकाळात काँग्रेसच्या विधानसभेच्या जागा एक वरून चारपर्यंत वाढल्या. मी स्वत: पाच निवडणुका लढल्या, त्यातील चार जिंकल्या.
ग्रामपंचायतपासून राजकारणाला सुरुवात केली. कुठेतरी थांबले पाहिजे, म्हणून कार्यकर्त्यांच्या भावना ओळखून आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षात शिस्त नाही, नौटंकी करणारे कार्यकर्ते भरले आहेत.
त्यांच्या बळावर विधानसभा निवडणूक जिंकणे शक्य नाही, म्हणूनच नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्याचेही कासावारांनी स्पष्ट केले. सोनिया गांधींनी नियुक्ती दिली म्हणूनच थेट त्यांच्याकडे राजीनामा पाठवत असल्याचे ते म्हणाले. आपल्या राजीनाम्याची मागणी बैठकीतही करता आली असती त्यासाठी पत्रपरिषद घेण्याची आणि पक्षांतर्गत विषय जाहीर करण्याची आवश्यकता नव्हती, असे कासावार म्हणाले.
विशेष असे की राजीनाम्याचा निर्णय जाहीर करताना कासावार एकटेच पत्रपरिषदेला सामोरा गेले. (कार्यालय प्रतिनिधी)