नागपुरातील यशवंत स्टेडियमला लाभले पुन्हा जुने रुपडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 10:13 PM2020-12-11T22:13:52+5:302020-12-11T22:15:16+5:30

Yashwant Stadium Nagpur News शहराच्या हृदयस्थळी असलेल्या यशवंत स्टेडियमची स्थिती टाळेबंदीच्या काळात एखाद्या अडगळीत पडलेल्या वास्तूसारखी झाली होती. आता मात्र, स्टेडियमला पुन्हा जुने रुपडे प्राप्त केले जात आहे.

Yashwant Stadium in Nagpur gets old money again! | नागपुरातील यशवंत स्टेडियमला लाभले पुन्हा जुने रुपडे!

नागपुरातील यशवंत स्टेडियमला लाभले पुन्हा जुने रुपडे!

googlenewsNext
ठळक मुद्दे टाळेबंदीच्या काळात अडगळीसारखी झाली होती स्थिती उंचच उंच गवताने झाकले गेले होते मैदान

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहराच्या हृदयस्थळी असलेल्या यशवंत स्टेडियमची स्थिती टाळेबंदीच्या काळात एखाद्या अडगळीत पडलेल्या वास्तूसारखी झाली होती. आता मात्र, स्टेडियमला पुन्हा जुने रुपडे प्राप्त केले जात आहे. मैदानावर वाढलेले गवत काढण्यात आले आहे. या संदर्भात लोकमतने सलग दोन दिवस प्रशासनाचे लक्ष केंद्रित केले होते. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

टाळेबंदीच्या काळात स्टेडियम बंद करण्यात आले होते. महापालिकेने याच काळात काही काळ स्टेडियममध्ये बाजारही भरवले होते. त्यामुळे, मैदान पूर्णत: उद्ध्व‌स्त झाले होते आणि मोठ्या प्रमाणात गवत वाढले होते. येथे खेळण्यास येणाऱ्या खेळाडूंना याचा त्रास होत होता आणि याबाबत तक्रारीही केल्या जात होत्या. मात्र, प्रशासनाने दुर्लक्षच केले. त्यानंतर हा विषय लोकमतने ८ व ९ डिसेंबरला उचलून धरताच झोपी गेलेले प्रशासन खडबडून जागे झाले आणि स्टेडियमच्या स्वच्छतेला गांभीर्याने घेतले. बातमी प्रकाशित होताच चार दिवसाच्या आत स्टेडियमच्या मैदानात उगवलेले गवत साफ करण्यात आले. आता स्टेडियमला जुने रूप प्राप्त झाले असल्याने येथे खेळण्यासाठी येणाऱ्या खेळाडूंनी आनंद व्यक्त केला आहे.

खेळाडूंनीही दिले योगदान

स्टेडियमच्या स्थितीबाबत मनपाचे क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले यांनी मनपाची आर्थिक स्थिती बरी नसल्याचे रडगाणे गायले होते. त्याअनुषंगाने काही खेळाडूंनी स्वेच्छेने साफसफाईमध्ये योगदान देत प्रशासनाच्या मोहिमेला हातभार लावला.

 लवकरच पूर्ण होईल अभियान

यशवंत स्टेडियममध्ये साफसफाईचे काम सुरू झाल्याचे महानगर पालिकेचे क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर यांनी सांगितले. हे काम आणखी काही दिवस सुरू राहील आणि लवकरात लवकर पूर्ण केले जाईल. येथे येणाऱ्या खेळाडूंना कुठल्याच समस्यांचा सामना करावा लागणार नाही, याची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात असल्याचेही आंबुलकर म्हणाले.

Web Title: Yashwant Stadium in Nagpur gets old money again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.