याकूबच्या फाशीचा ताण !
By Admin | Updated: July 27, 2015 03:22 IST2015-07-27T03:22:41+5:302015-07-27T03:22:41+5:30
मुंबईमध्ये बॉम्बस्फोट मालिकेने मोठा विध्वंस घडवून दहशतवादी कृत्य करणाऱ्या याकूब मेमनला नागपूर मध्यवर्ती

याकूबच्या फाशीचा ताण !
उपराजधानीत वाढला बंदोबस्त : आकस्मिक झडत्या, सर्वत्र नाकाबंदी
निशांत वानखेडे ल्ल नागपूर
मुंबईमध्ये बॉम्बस्फोट मालिकेने मोठा विध्वंस घडवून दहशतवादी कृत्य करणाऱ्या याकूब मेमनला नागपूर मध्यवर्ती कारागृहात फासावर लटकविले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून स्थानिक रहिवासी विलक्षण तणावात दिसून येत आहेत. फाशीनंतर या शहरात काय होईल, अशी चिंता साऱ्यांनाच भेडसावीत आहे. सामान्यजनांना पोलिसांकडून होणाऱ्या आकस्मिक झडत्या आणि नाकाबंदीला सामोरे जावे लागत आहे. पोलीस झोपडपट्ट्यांमध्ये शिरून झडत्या घेत आहेत. प्रस्तुत प्रतिनिधीने याच पार्श्वभूमीवर शहराचा फेरफटका मारला असता सामान्य व्यवहारात हा ताण दिसून आला.
सावधगिरीच्या सूचना
याकूबला दिल्या जाणाऱ्या फाशीमुळे शहर पोलिसांना अलर्ट करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये भयाचे वातावरण निर्माण होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेता, अशा ठिकाणी सावधगिरी बाळगण्याचा इशारा पोलीस विभागाकडून दिल्या जात आहे. शॉपिंग मॉल, सिनेमॉल, सिनेमागृहे, बाजार अशा ठिकाणी काहींना मौखिक तर काही ठिकाणी स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.काही दिवसांपासून सुरू असलेल्या हालचाली बघता, पोलीस विभागाकडून शहरात ‘वॉच’ वाढविल्याचे चित्र दिसून येत आहे. समाजकंटकांकडून घातपात घडवून आणण्याची शक्यता पाहता, शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी व आकस्मिक झाडाझडती घेतली जात आहे. अलर्ट लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
सिनेमागृहांनी वाढविली सुरक्षा व्यवस्था
पोलिसांकडून अलर्टच्या कोणत्याही आगाऊ सूचना आम्हाला मिळाल्या नाहीत. मात्र घटनेचा ताण आमच्यावरही असल्याचे स्मृती सिनेमागृहाचे व्यवस्थापक संतोष मिश्रा म्हणाले. आम्ही आमची सुरक्षा वाढविल्याची माहिती त्यांनी दिली. सुरक्षा रक्षक वाढविले असून, सीसीटीव्हीचा वॉचही वाढविल्याचे त्यांनी सांगितले. पंचशील सिनेमागृहाचे व्यवस्थापक राजा लहरिया यांनी पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांकडून जाता-येता सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिल्या जात असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे अधिकचे तीन सुरक्षा रक्षक आणि वॉच वाढविल्याचे ते म्हणाले.
टेकडी गणेश मंदिरात सावधगिरी
घातपाताच्या स्थितीमध्ये धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्याची शक्यता लक्षात घेता, टेकडी गणेश मंदिरात सावधगिरी बाळगण्यात येत आहे. स्पष्ट निर्देश मिळाले नसले तरी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून तसा इशारा मिळाल्याचे टेकडी मंदिर ट्रस्टचे एस.बी. कुलकर्णी यांनी सांगितले. त्यामुळे आता रात्रभर विजेचे दिवे सुरू ठेवण्यात येत आहेत, तर विशेष प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.