पुरुषांच्या शोषणावर लिहिणे दुर्मिळच

By Admin | Updated: April 9, 2016 03:16 IST2016-04-09T03:16:55+5:302016-04-09T03:16:55+5:30

साधारणत: लेखिका स्त्रीवादी झाल्या आहेत आणि स्त्रीवादाच्या एका विशिष्ट प्रवाहातच त्या सापडत आहेत की काय,...

Writing on the exploitation of men is rare | पुरुषांच्या शोषणावर लिहिणे दुर्मिळच

पुरुषांच्या शोषणावर लिहिणे दुर्मिळच

रवींद्र शोभणे : मनिषा साधू यांच्या चार पुस्तकांचे प्रकाशन
नागपूर : साधारणत: लेखिका स्त्रीवादी झाल्या आहेत आणि स्त्रीवादाच्या एका विशिष्ट प्रवाहातच त्या सापडत आहेत की काय,असा प्रश्न निर्माण होत असताना आखाती देशात पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाबाबत आणि शोषणाबाबत लिहिण्याचे धाडस एखाद्या लेखिकेने दाखवावे, ही साहित्य क्षेत्रातील अतिशय महत्त्वाची घटना आहे. भारतातून कामाच्या निमित्ताने अनेक पुरुष बायका-पोर व देश सोडून आखाती देशात जातात. पण तेथे या पुरुषांसोबत कसे वर्तन केले जाते, त्यांना कुठल्या शोषणाला सामोरे जावे लागते आणि यातून त्यांची स्थिती आणि मानसिकता कशी होते, याचे विवेचन करणारी कादंबरीच मनिषा साधू यांनी लिहिली असून यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही कादंबरी झाली असल्याचे मत कादंबरीकार रवींद्र शोभणे यांनी व्यक्त केले.
मनिषा साधू यांच्या पुरुषांच्या देशात ही कादंबरी, सटवाई आणि मुक्त मी हे मराठी कवितासंग्रह आणि ‘सांवला चांद’ हा हिंदी कवितासंग्रह शुक्रवारी डॉ. गिरीश गांधी यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. रवींद्र शोभणे बोलत होते. याप्रसंगी बाळासाहेब उपाध्ये प्रामुख्याने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या राष्ट्रभाषा संकुलातील संवाद कक्षात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी शोभणे म्हणाले, लेखनावर कुणाचाही आणि स्वत:चाही निर्बंध नसावा. अनुभवांना लेखनातून अभिव्यक्त होणे गरजेचे आहे, तेच खरे अस्सल लेखन असते. ज्याचे अनुभव समृद्ध असतात तो लेखनातून ते मांडतो. साहित्य क्षेत्रात कोण कुणाच्या पाठीत सुरा खुपसेल ते सांगता येत नाही. स्वत:चेच लेखन सरस आणि इतरांचे दुय्यम मानणाराही एक वर्ग आहे. पण अशा लोकांना न घाबरता आपली अभिव्यक्ती लेखनातून करीत राहणे, हेच लेखकाचे कर्तव्य आहे. सध्या महिला पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने लिहित असल्या तरी स्त्रीवादाच्या चक्रात साचल्यागत होत आहेत. आपला आवाका वाढवून नवनव्या विषयांना भिडण्याचे सामर्थ्य लेखिकांनी आत्मसात करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. साहित्यात सभ्य-असभ्य, श्लील-अश्लील असे काहीच नसते. ती त्या कथावस्तूची मागणी असते. पण आपल्याकडे मात्र अशा लेखनाला हिणवले जाते आणि केस पांढरे झाल्यावरच त्याचा उदोउदोही केला जातो, असे ते म्हणाले. गिरीश गांधी म्हणाले, काही चर्चासत्रातून कुणी बुद्धिवंत ठरत नाही. लेखक हा वाचक आणि समीक्षक रसिकांच्या भट्टीतून तावून सुलाखून निघतो त्यानंतरच त्याला श्रेष्ठत्व प्राप्त होते. यासंदर्भात वैदर्भीय उदारमतवादी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. संचालन शुभदा फडणवीस यांनी केले.(प्रतिनिधी)

Web Title: Writing on the exploitation of men is rare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.