संपर्कक्रांती एक्स्प्रेसमध्ये दोन लाखाचा गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 00:13 IST2018-02-20T00:10:29+5:302018-02-20T00:13:00+5:30
यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन संपर्कक्रांती एक्स्प्रेसच्या एसी कोचमधून रेल्वे सुरक्षा दलाने २० किलो गांजा जप्त करून लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.

संपर्कक्रांती एक्स्प्रेसमध्ये दोन लाखाचा गांजा जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन संपर्कक्रांती एक्स्प्रेसच्या एसी कोचमधून रेल्वे सुरक्षा दलाने २० किलो गांजा जप्त करून लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. एसी कोचने तस्करी करण्यात येत असलेल्या या गांजाच्या ट्रॉलीबॅगवर एका दिवसापूर्वी प्रवास केल्याचे एअर इंडियाचे सिक्युरिटी स्टिकर आढल्यामुळे हाय प्रोफाईल आरोपीकडून या गांजाची तस्करी करण्यात येत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
सोमवारी रेल्वेगाडी क्रमांक १२६४९ यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन संपर्कक्रांती एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक ए-१, बर्थ ११, १२ च्या मध्ये दोन बेवारस बॅग ठेवलेल्या असल्याची माहिती या गाडीत बल्लारशा ते नागपूर स्कॉटिंग करणारे आरपीएफ जवान राजेंद्र सिंह, प्रकाश खैरमारे, कुलदीप जाटव, अभिषेक टेकचंद, यशवंती पूर्वमाला, गीता यादव यांनी आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांना दिली. ही गाडी अटेंड करण्याची सूचना आरपीएफ नागपूर ठाण्याचे उपनिरीक्षक कृष्णानंद राय यांना देण्यात आली. सायंकाळी ५.१५ वाजता संपर्कक्रांती एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आल्यानंतर संबंधित कोचमधील प्रवाशांना बॅगबाबत विचारणा केली असता बॅगवर कुणीच आपला हक्क सांगितला नाही. आरपीएफचे उपनिरीक्षक दिलीप कुमार, जगदीश सोनी, हेमराज वासनिक, बिक्रम यादव यांनी दोन्ही बॅग गाडीखाली उतरविल्या. बॅगची तपासणी केली असता त्यात स्टिकरने चिपकविलेली गांजाची सहा पाकिटे आढळली. बाजारभावानुसार या गांजाची किंमत दोन लाख रुपये आहे. बॅगला स्वामी विवेकानंद एअरपोर्ट रायपूरचे १८ फेब्रुवारीला प्रवास केलेले विमानाचे सिक्युरिटी स्टिकर आढळले. त्यामुळे ही गाजांची तस्करी हाय प्रोफाईल आरोपीकडून होत असावी, असा संशय रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी व्यक्त केला आहे.