नागपुरातील निकृष्ट डांबरीकरण प्रकरण : अमृता कन्स्ट्रक्शनसह अभियंत्याला शो कॉज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 22:54 IST2020-02-07T22:52:41+5:302020-02-07T22:54:27+5:30
अयोध्यानगर येथील ३०० मीटर रस्त्याच्या निकृष्ट डांबरीकरण प्रकरणी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कंत्राटदारासह संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

नागपुरातील निकृष्ट डांबरीकरण प्रकरण : अमृता कन्स्ट्रक्शनसह अभियंत्याला शो कॉज
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अयोध्यानगर येथील ३०० मीटर रस्त्याच्या निकृष्ट डांबरीकरण प्रकरणी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कंत्राटदारासह संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यासोबतच संबंधित रस्त्याचे थर्ड पार्टी ऑडिट करण्यासह पुन्हा त्याच कंत्राटदाराकडून डांबरीकरण करण्याचे आदेश गुरुवारी रात्री जारी केले. संबंधित प्रकरणी कंत्राटदार कंपनी अमृता कन्स्ट्रक्शन, हनुमाननगर झोनचे कार्यकारी अभियंता अविनाश बाराहाते, उपअभियंता के.सी. हेडाऊ, कनिष्ठ अभियंता लामसुंगे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
अयोध्यानगर येथे प्रतापसिंह चव्हाण यांच्या घरापासून ते तडस यांच्या घरापर्यंत ३०० मीटर रस्त्यांचे डांबरीकरण व रुंदीकरणाचे काम काही महिन्यापूर्वी करण्यात आले. संबंधित कामावर १२ लाख रुपये खर्च झाले आहेत. संबंधित कामात गुणवत्तेकडे अजिबात लक्ष दिले गेले नाही. आयुक्त मुंढे यांना याबाबतची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने या प्रकरणी कंत्राटदार कंपनी व जबाबदार अभियंत्यास नोटीस जारी करीत खुलासा मागविला आहे.
विशेष म्हणजे आयुक्तांच्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे की, संबंधित रस्त्याचे काम कंत्राटदार कंपनी अमृता कन्स्ट्रक्शनला पुन्हा करावे लागेल. निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी थर्ट पार्टी मार्फत करावी. चौकशीचा अहवाल आल्यानंतरच कारवाईची रुपरेषा निश्चित केली जाईल. आयुक्त मुंढे आल्यापासून अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकरणात स्पष्टीकरण मागवण्यात आलेले आहे.