जागतिक क्षयरोग दिन; महिलांमध्ये वाढतोय ‘ड्रग रेझिस्टंट टीबी’
By सुमेध वाघमार | Updated: March 24, 2023 08:00 IST2023-03-24T08:00:00+5:302023-03-24T08:00:10+5:30
Nagpur News मेडिकलच्या श्वसनरोग विभागाने २००७ ते २०२३ या कालावधीतील क्षयरोग रुग्णांचा अभ्यास केला असता यातील २,२२४ रुग्णांना ‘ड्रग रेझिस्टंट टीबी’ आढळून आला.

जागतिक क्षयरोग दिन; महिलांमध्ये वाढतोय ‘ड्रग रेझिस्टंट टीबी’
नागपूर : क्षयरोगावरील उपचार बंद केल्यास औषध प्रतिरोधक क्षयरोग (ड्रग रेझिस्टंट टीबी) होण्याचा धोका असतो. मेडिकलच्या श्वसनरोग विभागाने २००७ ते २०२३ या कालावधीतील क्षयरोग रुग्णांचा अभ्यास केला असता यातील २,२२४ रुग्णांना ‘ड्रग रेझिस्टंट टीबी’ आढळून आला. धक्कादायक म्हणजे, २००८-१२ या कालावधीत ‘रेझिसटन्ट’ झालेल्या महिलांचे प्रमाण २८ टक्के होते. २०१८-२३ मध्ये ते वाढून ४२ टक्क्यांपर्यंत पोहचले.
टीबी हा जगातील सर्वात प्राणघातक संसर्गजन्य आाजरापैकी एक आहे. दररोज, ४१०० हून अधिक लोक क्षयरोगाने आपला जीव गमावतात. तर, जवळपास २८,००० लोक या टाळता येण्याजोग्या आणि बरे करण्यायोग्य रोगाला बळी पडतात. भारतात २००७-२०२० या दरम्यान ४,०५,६४८ ‘एमडीआर-टीबी’च्या प्रकरणांची नोंद झाली. यात १४,९३६ 'एक्सटेंडेड ड्रग-रेझिसटन्ट ट्युबरक्युलॉसिस'चे रुग्ण होते. ‘एमडीआर टीबी’ंमधून बरे झालेल्या रुग्णांचा दर ४९ टक्के तर ‘एक्सडीआर टीबी’मधून बरे झालेल्या रुग्णांचा दर ३६ टक्के होता.
-मागील १५ वर्षातील क्षयरोगाच्या रुग्णांवर अभ्यास
मेडिकलच्या पल्मोनरी मेडिसिन विभागाचे प्रमुख व डीआरटीबी केंद्राचे प्रभारी नोडल अधिकारी डॉ. सुशांत मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली मागील १५ वर्षांतील क्षयरोगाच्या रुग्णांचा अभ्यास केला. यात २,२२४ रुग्णांना ‘एमडीआर-टीबी’ होता. यात ६२ टक्के रुग्ण हे पुरुष होते तर ३८ टक्के रुग्ण या महिला होत्या. २००८-२०१२ या वर्षात ‘ड्रग रेझिस्टंट टीबी’ असलेल्या महिला रुग्णांची संख्या २८ टक्केहोती. २०१३-१७ या वर्षात वाढून ३८ टक्के तर २०१८-२३ या कालावधीत ४२ टक्क््यांवर पोहचली.
-‘ड्रग रेझिस्टंट टीबी’ झाल्यांमध्ये तरुणांची संख्या अधिक
डॉ. मेश्राम यांनी ‘लोकमत’ला सांगितले, अभ्यासात असे आढळून आले की, ‘ड्रग रेझिस्टंट टीबी’झालेल्यांमध्ये १९ ते ३९ वयोगटातील तरुणांची संख्या सर्वाधिक म्हणजे ५८ टक्के होते. ४० ते ५९ वयोगटातील मध्यवर्गीय प्रौढांची संख्या २९ टक्के, ६० व त्यापुढील वयोगटात ७ टक्के तर १८ वर्षाखालील मुलांची संख्या ६ टक्के होती.
- ९४ टक्के रुग्णांना फुफ्फुसाचा टीबी
या अभ्यासात ९४ टक्के रुग्णांना प्रतिरोधक फुफ्फुसीय क्षयरोग म्हणजे ‘रेझिस्टंट पल्मोनरी ट्युबरक्युलॉसिस’होता. तर, ७ टक्के रुग्णांना गंभीर स्वरुपातील हा आजार होता. चिंताजनक म्हणजे, २००७-१२ मध्ये या आजराचे प्रमाण ०.२० टक्के होते. २०१८-२३ मध्ये ते वाढून ११ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
-लहान वयात क्षयरोग झाल्यास पूर्ण औषधोपचार घ्या
२५ ते ३४ वयोगटातील तरुणांमध्ये ‘एमडीआर टीबी’ व ‘एक्सडीआर टीबी’चे रुग्ण मोठ्या संख्येत आढळून येतात. या मागील कारण म्हणजे, लहान वयात क्षयरोगाचे संक्रमण झाल्यानंतर अर्धवट औषधे घेतल्याने होतो. शिवाय या वयात हार्माेनल बदल होतात. ताण वाढलेला असतो. पुरेशी झोप घेतली जात नाही. आहाराकडे दुर्लक्ष केले जाते, याच वयात वाईट सवयी व व्यसन लागते. याचा परिणाम रोगप्रतिकारक्षमतेवर होतो. हे कमी होताच या दोन्ही रोगाचा विळखा घट्ट होतो.
-डॉ. सुशांत मेश्राम, प्रमुख, पल्मोनरी मेडिसिन विभाग मेडिकल