जागतिक स्थूलता दिवस; लठ्ठ व्यक्तींना ‘डेडिकेटेड ओबेसीटी’ कक्षाचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 07:00 IST2020-03-04T07:00:00+5:302020-03-04T07:00:04+5:30
लठ्ठपणा हा एक आजार आहे, आणि त्यावरील योग्य उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) ‘डेडिकेटेड ओबेसीटी’ कक्ष सुरू केला आहे. मध्यभारतातील हा पहिलाच प्रयोग ठरला असून लठ्ठव्यक्तींना या कक्षाचा मोठा आधार होत आहे.

जागतिक स्थूलता दिवस; लठ्ठ व्यक्तींना ‘डेडिकेटेड ओबेसीटी’ कक्षाचा आधार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतात समृद्धी वाढत असतानाच लठ्ठ लोकांचे प्रमाणही वाढत असून ते हाताबाहेर चाललेले आहे. लठ्ठ होण्यामागे काही विशिष्ट कारणे असतात. त्यामध्ये शरीराला हालचाली नसणे, बैठी कामे, अधिक उष्मांकाचा आहार यांचा समावेश होतोच, पण आनुवंशिकता आणि शरीराच्या चयापचय क्रि यांतील असमतोल हेही कारणे असतात. लठ्ठपणा हा एक आजार आहे, आणि त्यावरील योग्य उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) ‘डेडिकेटेड ओबेसीटी’ कक्ष सुरू केला आहे. मध्यभारतातील हा पहिलाच प्रयोग ठरला असून लठ्ठव्यक्तींना या कक्षाचा मोठा आधार होत आहे.
लठ्ठपणा म्हणजे शारीरिक बेढबपणा नाही, तर तो एक रोग असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जाहीर केले आहे. लठ्ठपणामुळे वाढते आजार लक्षात घेऊन लठ्ठपणामुक्त महाराष्ट्रासाठी ‘डेडिकेटेड ओबेसीटी’कक्ष सुरू करण्याची घोषणा तत्कालिन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी केली होती. याची सुरुवात नागपूरच्या मेडिकलमधून करण्यात आली. औषधवैद्यकशास्त्र विभागात हा स्वतंत्र कक्ष असून आठवड्याला दहावर रुग्ण उपचारासाठी येत आहे. विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गोसावी यानी सांगितले, या कक्षात लठ्ठ रुग्णांची वैद्यकीय तपासणी करून पुढील उपचार केले जातात. सोबतच योग्य जीवनशैली आत्मसात करण्याचे समुपदेनही केले जाते. ज्या रुग्णांचे वजन जीवनशैलीत बदल व उपचार करूनही कमी होत नाही त्यांना बेरियाट्रिक शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जात आहे. ही शस्त्रक्रिया मेडिकलच्या शल्यक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. राज गजभिये यांच्या नेतृत्वात केली जाते.
पाचपैकी एक पुरुष किंवा स्त्री ‘ओव्हरवेट’
भारतात जंक फूड, अल्कोहोल व अयोग्य जीवनशैलीमुळे पाचपैकी एक पुरुष किंवा स्त्री ‘ओव्हरवेट’ किंवा ‘ओबेसिटी’ग्रस्त आहे. भारत हा ‘ओबेसिटी’ या लठ्ठपणाशी संबंधित आजारात जगात तिसऱ्या क्रमांकांचा देश आहे. ‘ओबेसिटी’ हा एक आजार आहे, हे लोकांना माहितीच नाही. वजन जास्त असल्यामुळे मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब, आर्थ्रायटिस, कर्करोग, अॅथरोस्केरासिस असे आजार होऊ शकतात.
लठ्ठपणा हा एक आजार
लठ्ठपणातून येणाऱ्या विविध आरोग्यविषयक समस्यांना बहुसंख्य लोक तोंड देत आहेत. लठ्ठपणा हा एक आजार आहे. तो होण्यामागे काही विशिष्ट कारणे असतात. त्याच कारणांवर ‘डेडिकेटेड ओबेसीटी’ कक्षात उपचार केले जातात. यासाठी स्वतंत्र कक्ष रुग्णांच्या सेवेत आहे.
-डॉ. राजेश गोसावी
प्रमुख, औषधवैद्यकशास्त्र विभाग