बांबू उद्योगासाठी कामगारांना प्रशिक्षण द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:08 IST2021-04-06T04:08:28+5:302021-04-06T04:08:28+5:30

नागपूर : महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या माध्यमातून स्थानिक बुरड, कुंभार, पेंटर आदी कामगारांना त्यांच्या परंपरागत व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन कुशल ...

Workers should be trained for the bamboo industry | बांबू उद्योगासाठी कामगारांना प्रशिक्षण द्यावे

बांबू उद्योगासाठी कामगारांना प्रशिक्षण द्यावे

नागपूर : महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या माध्यमातून स्थानिक बुरड, कुंभार, पेंटर आदी कामगारांना त्यांच्या परंपरागत व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन कुशल बनवावे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून या युवकांना काम मिळेल. सेमिनरी हिल येथे येणाऱ्या स्थानिक पर्यटकांना येथे प्रत्यक्ष काम पाहता येईल तसेच बांबूपासून तयार वस्तूही विकत घेता येतील, असे पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी सांगितले.

सेमिनरी हिल येथील महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या बांबू ऑक्सिजन पार्क येथे पालकमंत्री नितीन राऊत यांनी सकाळी भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, उपवनसंरक्षक प्रभू नाथ शुक्ल, आरएफओ विजय गंगावणे यावेळी उपस्थित होते.

वन विभागाच्या महाराष्ट्र बांबू विकास मंडळाकडून सेमिनरी हिल येथील अडीच एकर जागेवर ४९ प्रकारच्या बांबूची लागवड करण्यात आली असून, त्यांचे जतन आणि संवर्धन करण्यात येत आहे. येथे बांबूआधारित लघु उद्योग सुरू करण्यावर भर देण्याची सूचना दिली. त्यासाठी बांबूआधारित व्यवसाय करणाऱ्या युवकांना चंद्रपूर येथील बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण देण्यास सांगितले. प्रशिक्षणानंतर या तरुणांना सेमिनरी हिल येथे गाळे अथवा जागा देऊन व्यवसाय करण्यासाठी मदत करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. त्यामुळे येथे येणाऱ्या स्थानिक पर्यटकांना बांबूपासून बनविण्यात येणाऱ्या विविध वस्तू विकत घेता येतील.

चौकट

असे आहे बांबू ऑक्सिजन पार्क

बांबू ऑक्सिजन पार्क येथे विविध प्रकाराच्या ४९ जातीची बांबूची रोपे असलेले विशेष उद्यान विकसित करण्यात येत असून, येथे स्थानिक पर्यटकांना चांगला विरंगुळा मिळणार आहे. शिवाय या पार्कमधील पायवाटांच्या दुतर्फा बांबूपासूनच कठडे बनविण्यात आले आहेत. बांबूपासून बनविण्यात आलेले कारंजेही उपस्थितांचे लक्ष वेधून घेतील. या पार्कमधील कॅन्टीनही पूर्णत: बांबूपासून तयार केली आहे. शिवाय बांबू पार्कमधील टेबल, खुर्ची, बाक, मोठ्या झाडांचे ओटे असलेले बांबू हट बनविण्यात आले आहे.

Web Title: Workers should be trained for the bamboo industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.