कामगाराची हत्या की आत्महत्या?

By Admin | Updated: April 3, 2016 03:52 IST2016-04-03T03:52:20+5:302016-04-03T03:52:20+5:30

कंत्राटी कामगाराने गळफास लावून गुरुवारी कंपनीत आत्महत्या केली. या घटनेस तीन दिवसांचा कालावधी लोटूनही पोलिसांच्या तपासाला गती आली नाही.

Worker's murder suicide? | कामगाराची हत्या की आत्महत्या?

कामगाराची हत्या की आत्महत्या?

गूढ अद्याप कायम : बुटीबोरीत विविध चर्चेला उधाण
बुटीबोरी : कंत्राटी कामगाराने गळफास लावून गुरुवारी कंपनीत आत्महत्या केली. या घटनेस तीन दिवसांचा कालावधी लोटूनही पोलिसांच्या तपासाला गती आली नाही. दुसरीकडे मृताच्या वडिलांनी घातपाताची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे ही आत्महत्या की हत्या याचे गूढ वाढत चालले आहे. या प्रकरणाची सर्वत्र चर्चा केली जात असून पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
प्रफुल्ल गौतम कोसारे (२५, रा. वॉर्ड क्रमांक - ५, व्हिडीओ चौक, बुटीबोरी) असे मृत कामगाराचे नाव आहे. प्रफुल्ल हा बुटीबोरी एमआयडीसी परिसरात इंडोरामा कंपनीतील इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट डिपार्टमेंटमध्ये ३ ते ४ वर्षांपासून कार्यरत होता.
तो बुधवारी (दि.३०) दुपारी २.३० ते रात्री १०.३० या पाळीत कामाला आला होता. त्यानुसार रात्री १०.३० वाजता काम संपल्यानंतर घरी जायला पाहिजे होता. या कंपनीत अंदाजे १२०० कंत्राटी कामगार काम करतात. त्यांच्यावर नियंत्रण वा लक्ष ठेवणे हे सुपरवायझरचे काम आहे. परंतु गुरुवारी (दि.३१) सकाळच्या सुमारास प्रफुल्ल लोखंडी अ‍ॅगलला गळफास लावून लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. कंपनीत कार्यरत कामगार गळफास लावतो मात्र ते कुणालाही दिसत नाही, यामुळे या प्रकरणात काही रहस्य दडले असावे, अशी नागरिकांत चर्चा आहे.
दुसरीकडे कंपनीतील कामगारांना कामावरुन कमी करणे सुरू आहे. पुरेशा सुविधा न देणे, असा गंभीर आरोप काहींनी केला आहे. कंपनीतील कामाच्या वाढत्या ताणामुळे कंटाळल्याने कामगार असा मार्ग पत्करतील काय, असा प्रश्न उपस्थित होतो. तसेच प्रफुल्ल नियमित कामावर असतानादेखील त्याच्या कामाबाबत मस्टर कार्डवर १५ ते २० दिवसांपासून गैरहजर दाखविले असल्याची कामगारांत चर्चा होती.
घटनेदरम्यान, कंपनी व्यवस्थापनाने प्रफुल्लच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी रेटून धरली. परंतु कार्यकर्त्यांनी तोडफोड केली म्हणून त्यांच्यावर गुन्हे नोंदविण्यात आले. मात्र कंपनीच्या आत कामगार गळफास लावतो, त्यावर कंपनी व्यवस्थापनावर कुठलीही कारवाई का नाही, असा प्रश्न कामगार उपस्थित करीत आहेत. (प्रतिनिधी)

चौकशीची मागणी
मृताचे वडील गौतम कोसारे यांनी बुटीबोरी पोलीस स्टेशनमध्ये प्रफुलने कंपनीत गळफास लावला नसून त्याची हत्या केली असल्याचा आरोप केला. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला गती देऊन सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गौतम कोसारे यांनी केली आहे.

Web Title: Worker's murder suicide?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.