लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यवतमाळ पोलिसांनी केलेल्या मॉक ड्रिलमुळे एका डोळ्याची दृष्टी गमावलेल्या गरजू भंगार कामगाराने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून स्वतः सह कुटुंबाच्या पालनपोषणासाठी ५० लाख रुपये भरपाईची मागणी केली आहे.
शाहरुख अली तसव्वर अली, असे याचिकाकर्त्यांचे नाव आहे. यवतमाळ पोलिसांनी जमावाला हाताळण्याचे प्रात्यक्षिक करण्यासाठी २९ ऑगस्ट २०२४ रोजी शारदा चौक या सार्वजनिक ठिकाणी माँक ड्रिल घेतली. त्यावेळी परिसरातील सामान्य नागरिकांच्या सुरक्षेकरिता योग्य उपाययोजना केल्या गेल्या नाही. शाहरुख अली बाजूला उभे राहून मॉक ड्रिल पाहत होते. दरम्यान, पोलिसांनी स्फोटकांचा उपयोग केल्यामुळे एक तीक्ष्ण तुकडा अली यांच्या उजव्या डोळ्यात शिरला दृष्टी गेली. त्यामुळे कुटुंबाच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अली यांनी यासंदर्भात ३० ऑगस्ट रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच, वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन भरपाईची मागणी केली. परंतु, त्यांची कोणीच दखल घेतली नाही. परिणामी, त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.
या प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने राज्याच्या गृह विभागाचे सचिव, पोलिस महासंचालक, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यासह इतर प्रतिवादींना नोटीस बजावून २६ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. मिर नगमान अली यांनी बाजू मांडली.
जखमी डोळ्यावर उपचार करण्यासाठी २ लाख ९० हजार रुपये खर्च झाले. पुढील उपचारासाठी पुन्हा दोन-तीन लाख रुपयांचा खर्च येणार आहे. सरकारने ही रक्कमही अली यांना अदा करावी. तसेच, या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार पोलिस अधिकान्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही न्यायालयाला करण्यात आली आहे.