कार्यकर्ता अभिनेता घडवितो
By Admin | Updated: October 9, 2015 02:56 IST2015-10-09T02:56:43+5:302015-10-09T02:56:43+5:30
‘अभिनेता’ ही माझी ओळख नाही. मी रिपब्लिकन पँथर चळवळीतील कार्यकर्ता आहे आणि हीच माझी ओळख आहे.

कार्यकर्ता अभिनेता घडवितो
सत्कार समारंभ : वीरा साथीदार यांचे प्रतिपादन
नागपूर : ‘अभिनेता’ ही माझी ओळख नाही. मी रिपब्लिकन पँथर चळवळीतील कार्यकर्ता आहे आणि हीच माझी ओळख आहे. अभिनेता त्यानंतर झालो. कार्यकर्ता हा अभिनेता घडवितो, मात्र कोणताही अभिनेता हा कार्यकर्ता घडवू शकत नाही, असे प्रतिपादन ‘आॅस्कर’ साठी नामांकन झालेल्या ‘कोर्ट’ या मराठी चिटपत्राचे अभिनेते वीरा साथीदार यांनी केले.
स्वयंदीप परिवार, संस्थेतर्फे वीरा साथीदार यांचा गुरुवारी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. सीताबर्डी येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला अतिथी म्हणून स्वयंदीप परिवार संस्थेचे प्रशांत ढाबरे, शामराव हाडके व भानुकुमार राऊत उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते वीरा साथीदार यांचा सत्कार करण्यात आला. साथीदार पुढे म्हणाले, आजही मी जयभीमनगरात राहतो, आणि मला त्याचा अभिमान वाटतो. ‘कोर्ट’ चित्रपटाविषयी बोलतांना ते म्हणाले, या चित्रपटात गंभीर विषयासह काही विनोदी प्रसंग सुद्धा आहेत. त्यामुळेच तो जगात सर्वांत चर्चित चित्रपट राहिला असून, त्याला ३२ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. विशेष म्हणजे, या चित्रपटाच्या माध्यमातून नारायण कांबळे हे पात्र जगापुढे पोहोचले आहे. त्याची जगाला ओळख झाली आहे. ‘कोर्ट’ चित्रपटाने मला ‘हिरो’ बनविले. मात्र मी आजही आंबेडकरी कार्यकर्ताच आहे. त्यामुळे आजही मी रस्त्याने फिरताना किंवा टपरीवर चहा पिताना दिसलो, की अनेकजण आश्चर्य व्यक्त करतात. परंतु आजही मी एक साधा कार्यकर्ता म्हणूनच जगतो आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे संचालन भानुकुमार राऊत यांनी केले.(प्रतिनिधी)