नक्षलवादाची किड नष्ट करण्यासाठी ग्राऊंडलेवलवर काम : पोलीस महासंचालक नगराळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 01:22 IST2021-02-26T00:43:09+5:302021-02-26T01:22:24+5:30
DG Nagrale, Naxalism नक्षलवादाची किड समूळ नष्ट करण्यासाठी ग्राऊंडलेवलवर काम करावे लागणार आहे. त्यासाठी स्ट्रॅटेजी तयार केली जात आहे, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी) हेमंत नगराळे यांनी दिली.

नक्षलवादाची किड नष्ट करण्यासाठी ग्राऊंडलेवलवर काम : पोलीस महासंचालक नगराळे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - नक्षलवादाची किड समूळ नष्ट करण्यासाठी ग्राऊंडलेवलवर काम करावे लागणार आहे. त्यासाठी स्ट्रॅटेजी तयार केली जात आहे, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी) हेमंत नगराळे यांनी दिली.
डीजीपी नगराळे यांनी गुरुवारी सायंकाळी लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांच्या यवतमाळ हाऊस या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी चर्चेदरम्यान ते म्हणाले, नक्षलवाद निपटून काढणे वाटते तेवढे सोपे नाही. नक्षल्यांची एक विशिष्ट पद्धत आहे. ते उपद्रव करताना दोन ते तीन राज्याच्या सिमेवरच्या जंगली भागाची निवड करतात. जंगल एवढे घनदाट की १० फुटांवर माणसाला माणूस दिसत नाही. संपर्क तसेच दळणवळणाची मुख्य अडचण आहे. ड्रोनच्या मदतीनेही त्यांच्या हालचाली टिपता येत नाही.
घातपात केल्यानंतर त्यांना या राज्यातून त्या राज्यात पळून जाणे सहज शक्य होते. पोलिसांना मात्र एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाताना मर्यादा येतात. हॉलिवूडच्या सिनेमात दाखवले जाते, तसे शक्य नाही. परंतू एवढ्या सर्व अडचणींवर मात करून पोलिसांनी नक्षलवाद नियंत्रित करण्यात यश मिळवले आहे.
मी १९९२ ला राजुऱ्याला एएसपी होतो. त्यावेळी नक्षल्यांच्या भ्याड हल्ल्यात माणिकगड पहाडावर ७ पोलीस शहीद झाले होते. त्यावेळी चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा तसेच नांदेडमध्येही नक्षल्यांचा फार उपद्रव होता. मध्यंतरीच्या कालावधीत पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत नक्षली कारवाया थोपविल्या. मात्र, अधूनमधून ते आपले अस्तित्व दाखवत असतात, असेही त्यांनी कबूल केले. नक्षल्यांचा बीमोड बंगाल पॅटर्ननुसार करता येणार नाही का असे विचारले असता त्यांनी ही किड समूळ नष्ट करण्यासाठी ग्राऊंडलेवलवर काम करायचे असून त्यादृष्टीने उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगितले. दहशतवादी, नक्षलवादी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आणि उपकरणाचा वापर करीत असल्याचा मुद्दा उपस्थित केला असता पोलीसही त्यांचा बीमोड करण्यासाठी मॉडर्न टेक्नॉलॉजी तसेच सायबर एक्सपर्टचा अधिकाधिक वापर करत असल्याचे ते म्हणाले.
उच्चशिक्षितांचा सेपरेट सेल
बीएससी, एमएससी, बीटेक असे उच्चशिक्षित तरुण पोलीस दलात नोकरी करीत आहेत. दुसरीकडे बारावी पास असलेलेही त्यांच्यासोबत कॉन्स्टेबल म्हणून सेवा देत आहे. एकाच पगारावर, सारखेच काम करताना उच्चशिक्षित तरुणांच्या मानसिकतेवर काही परिणाम होतो काय, असा मुद्दा उपस्थित झाला असता त्यांनी त्यावर उच्चशिक्षित तरुणांना स्पेशलायझेशनच्या धर्तीवर सेपरेट सेलची जबाबदारी सोपविण्याचा विचार असल्याचे ते म्हणाले. त्यांच्यासाठी वेगळा प्रोत्साहन भत्ता देण्याची मनिषाही त्यांनी व्यक्त केली.
पोलिसांना दडपणमुक्त बनविण्यासाठी उपाययोजना
ज्युडो चॅम्पियन असलेल्या नगराळे यांना पोलीस दलाला सुदृढ करण्यासाठी काय उपाययोजना करणार असा थेट सवाल केला असता २ लाख, २० हजारांच्या महाराष्ट्र पोलिसांना अनेकदा २० -२० तास काम करावे लागते. वेळेवर जेवण नाही, झोप नाही. यामुळे अनेक पोलिसांना अतिउच्च रक्तदाब, मधुमेह सारख्या गंभीर व्याधी जडल्या आहेत. यापूर्वीच्या वरिष्ठांनी योगा, मेडिटेशनसारखे उपक्रम राबविले आहे. पोलिसांना आनंदी आणि उत्साही तसेच दडपणमुक्त ठेवण्यासाठी काही ड्युटीचे तास कमी करण्यासोबतच आणखी काही संकल्पना आहेत. त्यावर विचारविमर्श सुरू असल्याचे नगराळे म्हणाले.