महिला वकिलाला पोलीस व्हॅनने चिरडले

By Admin | Updated: April 6, 2016 02:57 IST2016-04-06T02:57:58+5:302016-04-06T02:57:58+5:30

भरधाव पोलीस व्हॅनने चिरडल्यामुळे दुचाकीस्वार महिला वकिलाचा जागीच मृत्यू झाला. विधान भवनाजवळ मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास हा भीषण अपघात घडला.

The women's lawyer was beaten by a police van | महिला वकिलाला पोलीस व्हॅनने चिरडले

महिला वकिलाला पोलीस व्हॅनने चिरडले

विधान भवनाजवळील घटना : विधी वर्तुळात शोककळा
नागपूर : भरधाव पोलीस व्हॅनने चिरडल्यामुळे दुचाकीस्वार महिला वकिलाचा जागीच मृत्यू झाला. विधान भवनाजवळ मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. नितू नंदलाल बर्वे (वय ३४) असे मृत वकिलाचे नाव असून, त्या संत्रा मार्केट जवळच्या बजेरिया (भोईपुऱ्यात) राहात होत्या. या अपघाताने विधी वर्तुळात तीव्र शोककळा पसरली आहे.

जिल्हा न्यायालयात वकिली करणाऱ्या बर्वे नेहमीप्रमाणे आज सकाळी ११ ते ११.३० च्या सुमारास आपल्या प्लेझर दुचाकीने (एमएच ४९/ के ६२६०) कोर्टात जात होत्या. उशीर झाल्यामुळे त्या काहीशा गडबडीतच होत्या. विधान भवनासमोरच्या राजे बख्त बुलंदशहा यांच्या पुतळ्याजवळ पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांना घेऊन निघालेल्या भरधाव व्हॅनचा बर्वे यांच्या दुचाकीला कट लागला. त्यामुळे त्या दुचाकीवरून खाली पडल्या. त्यांच्या डोक्यावरून वाहनाचे चाक गेल्याने त्या जागीच गतप्राण झाल्या. वर्दळीच्या ठिकाणी भीषण अपघात झाल्यामुळे तेथे मोठी गर्दी जमली. बाजूलाच वाहतूक शाखेचे कार्यालय असल्यामुळे गर्दी जमल्याचे पाहून पोहोचलेल्या पोलीस शिपाई गजानन सेलूकर यांनी आपले सहकारी तसेच लोकांच्या मदतीने त्यांना अपघात करणाऱ्या पोलीस स्कूल व्हॅनमध्ये (एमएच ३१/ डीझेड ०२४३) घालून मेयोत नेले.
या अपघाताची माहिती कळताच मोठ्या प्रमाणात वकील मंडळींनी मेयोत धाव घेतली. सीताबर्डी पोलिसही पोहोचले. बर्वे यांची बहीण मेयोतच कार्यरत आहे. बहिणीचा मृतदेह पाहून बर्वे यांच्या बहिणीची शुद्धच हरवली. लगेच भावासह अन्य नातेवाईकही पोहोचले होते. या अपघातामुळे विधी वर्तुळात तीव्र शोककळा पसरली आहे.


फौजदार बनला आरोपी
नागपूर : बर्वे यांना भरधाव क्वॉलिस चालकाने धडक मारल्याचे वृत्त आधी सर्वत्र पसरले होते. काही वेळाने क्वॉलिस नव्हे तर पोलीस व्हॅननेच धडक मारल्याचे वृत्त चर्चेला आले. त्यामुळे बर्वे यांना नेमकी धडक कुणी मारली, त्याबाबत साशंकता होती. सीताबर्डीचे ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. परंतु त्यात अपघाताचे दृश्य दिसत नव्हते. प्रत्यक्षदर्शींचे बयान घेतले असता एकाच वेळी क्वॉलिस आणि पोलीस व्हॅन वेगात आल्याने बर्वे गोंधळल्या आणि त्यांना व्हॅनची धडक बसल्याचे काहींनी सांगितले. मात्र, पोलीस व्हॅन चालक कृष्णदास अवस्थी (सहायक फौजदार) आपल्या वाहनाने अपघात झाल्याचा इन्कार करीत होते. आपल्याला वाहनाच्या आरशात दुचाकीस्वार महिला पडून दिसल्याचे ते सांगत होते.
पोलिसांची प्रतिमा मलीन होऊ नये म्हणून आपण विद्यार्थ्यांची व्हॅन थांबवून बर्वे यांना मेयोत नेण्यास मदत केल्याचे अवस्थी पोलिसांना सांगत होते. मात्र, अनेक प्रत्यक्षदर्शींनी पोलीस व्हॅननेच अपघात झाल्याचे सांगितल्यामुळे रात्री सीताबर्डी पोलिसांनी व्हॅन चालक अवस्थी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ५८ वर्षीय अवस्थी निवृत्तीच्या उंबरठ्यावर असून, नोकरीवर कसलाही डाग लागू नये म्हणून आपण व्हॅन चालक म्हणून सेवा देत होतो, असे ते सांगत होते.
बोगस हेल्मेट कारवाई का नाही
शहरात हेल्मेटची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर बनावट हेल्मेटचा सुळसुळाट वाढला आहे. विशेषत: महिलांसाठी असलेल्या हेल्मेटमध्ये हा प्रकार धडाक्यात सुरू आहे. मुख्य रस्त्यांच्या फुटपाथासोबतच गल्लीबोळातील दुकानांत हेल्मेटच्या बोगसगिरीचा सावळागोंधळ उडाला आहे. परंतु अद्यापही पोलीस, आरटीओ किंवा भारतीय मानक ब्युरोतर्फे यांच्यावर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चालक कारवाईच्या धास्तीने स्वस्तात मिळणारे किंवा बोगस ‘आयएसआय’ मार्कचे हेल्मेट विकत घेऊन आपला जीव धोक्यात घालत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The women's lawyer was beaten by a police van

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.