किचनचे बजेट सुधारले तरच अर्थसंकल्पाला अर्थ, गृहिणींची प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2022 11:31 IST2022-02-02T10:53:28+5:302022-02-02T11:31:24+5:30
स्वयंपाकघरावर वाढलेला आर्थिक ताण कमी करण्याच्या हेतूने काही तरी विशेष सवलती, घोषणा केल्या जातील, अशा अपेक्षा गृहिणींना होत्या. मात्र, एकही अपेक्षा पार न पडल्याने गृहिणींनी अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली आहे.

किचनचे बजेट सुधारले तरच अर्थसंकल्पाला अर्थ, गृहिणींची प्रतिक्रिया
नागपूर : केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पाकडून महिलांना विशेष अपेक्षा होत्या. एक महिला असल्याच्या नात्याने गृहिणींच्या भावना त्या उत्तम जाणतात. त्यामुळे, स्वयंपाकघरावर वाढलेला आर्थिक ताण कमी करण्याच्या हेतूने काही तरी विशेष सवलती, घोषणा केल्या जातील, अशा अपेक्षा गृहिणींना होत्या. मात्र, एकही अपेक्षा पार न पडल्याने गृहिणींनी अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली आहे.
स्वयंपाकघरासाठी काहीच नाही
वाढत्या महागाईमध्ये घराचा अर्थसंकल्प सांभाळणे कठीण होत आहे. वित्तमंत्र्यांनी देशातील विविध घटकांना काही ना काही समाधान दिले असले तरी एक महिला म्हणून स्वयंपाक घराकडे लक्ष देणे अपेक्षित होते.
- निशा घरजाळे (गृहिणी), नवी शुक्रवारी, महाल
गॅसचे दर कमी व्हायला हवे
अर्थसंकल्पाबाबत बोलणे कठीण असले तरी स्वयंपाकाच्या गॅसची किंमत कमी होणे अपेक्षित होते. महागाईमध्ये घराचे कंबरडे मोडले आहे. गृहिणी म्हणून माझ्यासाठी ते सांभाळणे तारेवरची कसरत आहे.
- नम्रता राऊत (गृहिणी), गिऱ्हे लेआऊट, झिंगाबाई टाकळी
शिक्षणाचा विचार झाल्याचा आनंद
वित्तमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य मुलांच्या शिक्षणाचा विचार केला आहे. गरीब मुलांसाठी ऑनलाइन शिक्षणाबाबत विचार झालेला आहे. गृहिणी म्हणून मुलांचे शिक्षण प्रत्येकासाठी महत्त्वाचे असते.
- जयश्री चव्हाण (गृहिणी), हिवरीनगर
आयकरात सवलत हवी होती
आज सादर झालेला अर्थसंकल्प सर्वदृष्टीने चांगलाच दिसतो. मात्र, आयकर स्लॅबमध्ये काही प्रमाणात सवलत मिळाली असती तर मध्यमवर्गीय कुटुंबाला आधार झाला असता.
- कांचन ठाकरे (गृहिणी), लवकुशनगर, मानेवाडा