गणपती मंडळाच्या प्रवेशद्वाराजवळ विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2022 22:30 IST2022-09-08T22:29:39+5:302022-09-08T22:30:09+5:30
Nagpur News भेंडे ले आउट येथील गणपती मंडळाच्या प्रवेशद्वाराजवळ विजेचा शॉक लागून एका महिलेचा मृत्यू झाला.

गणपती मंडळाच्या प्रवेशद्वाराजवळ विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू
नागपूर : भेंडे ले आउट येथील गणपती मंडळाच्या प्रवेशद्वाराजवळ विजेचा शॉक लागून एका महिलेचा मृत्यू झाला. कमलाबाई रेवडे (८०, मनीष ले-आउट) असे मृतक महिलेचे नाव आहे.
भेंडे ले-आउट येथे सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना झाली असून, बाजूच्या मनपाच्या अखत्यारितील जागेवर मेळा लावण्यात आला आहे. गणपतीचे दर्शन व मेळा यासाठी या ठिकाणी लोकांची प्रचंड गर्दी असते. कमलाबाई रेवडे या कुटुंबीयांसह गणपतीच्या दर्शनाला सायंकाळच्या सुमारास गेल्या होत्या. दर्शन केल्यानंतर त्या प्रवेशद्वाराच्या दिशेने आल्या. स्टॅंडवरून त्यांनी चप्पल घेतली व प्रवेशद्वाराजवळ चप्पल घालत असताना त्यांनी दरवाजाचा आधार घेतला. त्यात विजेचा प्रवाह होता व त्यांना जोरदार शॉक बसला. त्या जागेवरच बेशुद्ध झाल्या.
त्यांच्या कुटुंबीयांना ही बाब लक्षात आल्यावर त्यांनीच त्यांना तातडीने एका खासगी इस्पितळात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांना याची माहिती देण्यात आली, अशी माहिती त्यांचे नातू पंकज रेवडे यांनी दिली. भेंडे ले-आउट येथे दरवर्षी सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना होत असते व तेथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी असते. इलेक्ट्रिकचे कनेक्शन घेत असताना योग्य वायरिंग झाले नसल्याने प्रवाह येण्याची शक्यता असल्याचा अंदाज रेवडे यांच्या कुटुंबीयांनी वर्तविला आहे. यासंदर्भात पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.