नागपुरात टिप्परच्या धडकेत महिला ठार; पुतणी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 14:42 IST2017-11-06T14:38:47+5:302017-11-06T14:42:20+5:30
भरधाव टिप्परने मागून जोरदार धडक मारल्यामुळे दुचाकीवर बसून असलेल्या एका महिलेचा करुण अंत झाला. तर, तिची पुतणी जखमी झाली.

नागपुरात टिप्परच्या धडकेत महिला ठार; पुतणी जखमी
आॅनलाईन लोकमत
नागपूर : भरधाव टिप्परने मागून जोरदार धडक मारल्यामुळे दुचाकीवर बसून असलेल्या एका महिलेचा करुण अंत झाला. तर, तिची पुतणी जखमी झाली. नंदा मुरलीधर कुंभारे (वय ४६) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या त्रिमूर्तीनगरात राहत होत्या.
नंदा यांची पुतणी पूजा रविवारी नागपुरात आली होती. तिने मोठीआई नंदा यांना आपल्या अॅक्टीव्हावर बसवून रविवारी रात्री ७ च्या सुमारास सीताबर्डीत आणले. तेथून त्या दोघी पंचशील चौक मार्गे लोकमत चौकाकडे येत होत्या. या मार्गावरील पेट्रोल पंपाजवळ भरधाव टिप्पर (एमएच ३१/ सीक्यू ६९९०) चालकाने पूजा चालवित असलेल्या दुचाकीला मागून जोरदार धडक मारली. त्यामुळे मागे बसलेल्या नंदा कुंभारे खाली पडल्या. टिप्परचा समोरचा भाग डोक्याला लागल्यामुळे त्या जागीच गतप्राण झाल्या. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. जमावाने टिप्परचालक आरोपी नंदू चिवली गोयल (वय ३८, रा. पांढराबोडी) याच्याकडे धाव घेतली. त्याला बेदम चोप दिला. तणावामुळे वाहतूक ठप्प झाली. माहिती कळताच धंतोलीचे पोलीस उपनिरीक्षक ए. के. वडस्कर आपल्या सहकाºयांसह घटनास्थळी पोहचले. त्यांनी जमावाच्या ताब्यातून आरोपी गोयलला ताब्यात घेतले. जमावाला पांगवल्यानंतर मृतदेह मेडिकलमध्ये रवाना करण्यात आला. अपघातामुळे जबर मानसिक धक्का बसलेल्या पूजालाही मेडिकलमध्ये नेले. तिने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपी गोयलविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
नंदा यांच्या जाण्याने आनंदावर विरजण
पूजा नरेश कुंभारे रामटेकच्या जैन मंदीर मार्गावर राहते. तिचे लग्न २५ नोव्हेंबरला पार पडणार आहे. लग्नाच्या खरेदीच्या निमित्ताने पूजा नागपुरात आली आणि आपल्या मोठ्या आईसोबत शॉपींगसाठी सीताबर्डीत आली होती. मात्र टिप्परच्या रुपात आलेल्या काळाने नंदा यांना हिरावून नेले आणि कुंभारे परिवारांच्या आनंदावर विरजण टाकले.