विमान लॅंडिंगदरम्यान महिला सहप्रवाशाचा विनयभंग, पुण्यातील आरोपी ताब्यात
By योगेश पांडे | Updated: October 10, 2023 16:25 IST2023-10-10T16:24:50+5:302023-10-10T16:25:17+5:30
सोमवारी सव्वा बारा वाजताच्या सुमारास पुणे ते नागपूर विमानात फिरोज प्रवास करत होता.

विमान लॅंडिंगदरम्यान महिला सहप्रवाशाचा विनयभंग, पुण्यातील आरोपी ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विमानात प्रवास करणे हे तुलनेने सुरक्षित मानण्यात येते, मात्र मागील काही दिवसांपासून विमानप्रवासातदेखील गुन्हे घडल्याची बाब समोर आली आहे. डॉ.बाबासाहे आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरदेखील असाच प्रकार समोर आला आहे. विमानातील एका प्रवाशाने लॅडिंगदरम्यान महिला सहप्रवाशाचा विनयभंग केला. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला अटक केली आहे.
फिरोज शेख नूर मोहम्मद शेख (३२, दुर्रानी कॉम्प्लेक्स, मिठानगर, कोंढवा) असे आरोपीचे नाव आहे.
सोमवारी सव्वा बारा वाजताच्या सुमारास पुणे ते नागपूर विमानात फिरोज प्रवास करत होता. त्याच्या बाजुला ४० वर्षीय महिला बसली होती. विमान नागपूर विमानतळावर लॅंडिंग करत असताना फिरोजने महिलेकडे पाहून अगोदर अश्लिल इशारा केला व त्यानंतर तिच्यासोबत अश्लिल कृत्य करून विनयभंग केला.
महिलेने अगोदर विमानातील कर्मचाऱ्यांना या प्रकाराची माहिती दिली व त्यानंतर तिने विमानतळावर उतरल्यावर सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी फिरोजविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.